संतप्त शेतकऱ्यांकडून बँकेला पैशांचे तोरण बांधण्याचा प्रयत्न
By विजय पाटील | Updated: April 22, 2023 15:31 IST2023-04-22T15:28:57+5:302023-04-22T15:31:18+5:30
पीककर्जामधून परस्पर विमा रक्कम कपात केल्याचा प्रकार

संतप्त शेतकऱ्यांकडून बँकेला पैशांचे तोरण बांधण्याचा प्रयत्न
गोरेगाव (जि. हिंगोली) : येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत गत काही वर्षांपासून पीककर्जधारक शेतकऱ्यांच्या खात्यामधून परस्पर विमा रक्कम कपात केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्त्वात आंदोलनाचा इशारा देत २१ एप्रिल रोजी शेतकऱ्यांकडून बँकेला पैशांच्या नोटांचे तोरण बांधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
शेतकऱ्यांच्या पीककर्ज खात्यामधून ‘एसबीआय जनरल इन्शुरन्सच्या’ नावावर हजारो रुपये विम्याची रक्कम परस्पर कपात करीत फसवणूक केल्याची तक्रार स्वाभिमानीचे नामदेव पतंगे, गजानन कावरखे व इतर शेतकऱ्यांच्या वतीने ११ एप्रिल रोजी येथील भारतीय स्टेट बँक शाखाधिकाऱ्यांकडे केली. याप्रकरणी चौकशी करून कारवाईची मागणी करत आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
यानुषंगाने २१ एप्रिल रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्त्वामध्ये शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलनादरम्यान बँक शाखेला पैशांच्या नोटांचेे तोरण बांधण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी शाखाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेदरम्यान एक महिन्यात चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी स्वाभिमानीचे नामदेव पतंगे, गजानन कावरखे, माधवराव देशमुख, दशरथ मुळे, संदीप कालवे आदींसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांची हेळसांड थांबवा...
आंदोलन स्थगित ठेवण्याची विनंती करीत मुख्य व्यवस्थापक अजित कुलकर्णी, योगेश पाटील व शाखा व्यवस्थापक प्रसाद काळे यांनी शेतकरी व स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. याप्रसंगी बँकेत घडलेल्या सदर प्रकाराबाबत चौकशी करून महिनाभरात कारवाई करू, असे आश्वासन दिले.