आठ महिन्यांपूर्वीच रुजू झालेल्या कृषी पर्यवेक्षकाचा कार्यालयातच खून; कामगारांवर संशयाची सुई?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 19:17 IST2024-03-15T19:16:59+5:302024-03-15T19:17:35+5:30
कृषी पर्यवेक्षकाचा कार्यालयातच धारदार हत्याराने केला खून; रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

आठ महिन्यांपूर्वीच रुजू झालेल्या कृषी पर्यवेक्षकाचा कार्यालयातच खून; कामगारांवर संशयाची सुई?
- रमेश कदम
आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : आखाडा बाळापूर येथील कृषी संशोधन व तालुका बीजगुणन केंद्राचे प्रमुख तथा कृषी पर्यवेक्षकांचा कार्यालयातच अज्ञाताने धारदार शस्त्राने खून केला आहे. तोंडावर, छातीवर, हातावर धारदार शस्त्राचे वार असून, रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह आढळला. दरम्यान, या प्रकरणी कार्यालयात कामावर असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांवर संशयाची सुई गेली असून संशयित आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके बाहेरगावी रवाना झाली आहेत.
नांदेड ते हिंगोली रोडवर आखाडा बाळापूरनजीकच कृषी विभागाचे तालुका बीजगुणन केंद्र तथा शेतकरी प्रशिक्षण, कृषी संशोधन केंद्र कार्यरत आहे. येथे शेतीवर संशोधन व बीजगुणनाचे काम केले जाते. याठिकाणी कार्यरत असलेले बीजगुणन केंद्राचे प्रमुख तथा कृषी पर्यवेक्षक राजेश शिवाजीराव कोल्हाळ (वय ३६, रा. कोंडवाडा, ता. सेनगाव, जि. हिंगोली) यांचा त्यांच्या कार्यालयातच १४ मार्च रोजी खून झाल्याची घटना घडली. सकाळी ११:३० वाजता ते कार्यालयात येऊन नियमित कामकाज करत होते. त्यानंतर येथील कामगार कार्यालयात काही कामानिमित्त आले असता, त्यांना रक्ताच्या थारोळ्यात अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला. उपविभागीय पोलिस अधिकारी थोरात, ठाणेदार सुनील गोपीनवार, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
रक्ताच्या थारोळ्यात मॄतदेह
शेतकरी प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीतील कार्यालयात टेबलवर कोल्हाळ काम करत होते. टेबलवरच मोबाइल, काही मस्टर, रजिस्टर उघडून ते लिहित असावेत. मारेकरी त्याचवेळी तेथे आल्याने खुर्चीत बसले असतानाच त्यांच्यावर वार करण्यात आला. पहिला वार त्यांनी हातावर झेलला. मनगटावर वार झाल्याने ते खाली कोसळले. त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर, छातीवर, पोटावर धारदार शस्त्राने वार केले गेले. तरुण अधिकारी रक्ताच्या थारोळ्यात पडला. फरशीवर, टेबलवर, आडव्या झालेल्या खुर्चीवर सर्वत्र रक्तच रक्त दिसून आले. टेबलवर मोबाइल, पेन आणि मस्टर खुल्या अवस्थेत आढळून आले.
सफाई करणाऱ्या कामगाराची पडली नजर
ऑडिट होणार असल्याने गोदामातील सामान लावून घेण्यासाठी रोजंदारी कामगार भगीरथ पंडित याला अधिकाऱ्याने बोलावून घेतले होते. हे काम करत असताना कचरा फेकायला जात असताना दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास कोल्हाळ हे खाली पडलेले असल्याचे दिसले. त्याची नजर जाताच त्याने गोडावून इन्चार्जला बोलावून घटना दाखवली असता, रक्ताच्या थारोळ्यात कृषी पर्यवेक्षक पडल्याचे दिसले. यावेळी दोघेही घाबरले. त्यानंतर त्यांनी इतर ग्रामस्थ व पोलिसांना याबाबतची माहिती दिली.
आठ महिन्यांपूर्वीच बाळापुरात रूजू
सन २०१४मध्ये ते कृषी विभागात रूजू झाले. पण, ते विदर्भात कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वीच ते मराठवाड्यात बदली करून आले होते. आठ महिन्यांपूर्वीच बाळापुरात रूजू झाले असल्याची माहिती कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि लहान मूल असल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले.
कामगारांवरच संशयाची सुई
बीजगुणन केंद्रात पाच ते सहा रोजंदारी कर्मचारी काम करतात. गत ३५ वर्षांपासून ते याठिकाणी कार्यरत असल्याचे सांगण्यात येते. दोन दिवसांपूर्वी येथे वाळलेल्या गवताला आग लागल्याची घटना घडली होती. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यावर पर्यवेक्षक कोल्हाळ यांनी संताप व्यक्त केला होता. त्या कारणावरून वादही झाल्याचे कामगारांनी सांगितले. शिक्षा म्हणून तीन ते चार दिवस त्याला कामावर घेऊ नका, असेही बोलल्याची चर्चा आहे. आज पुन्हा कर्मचाऱ्यांशी वाद झाला की काय? या कारणाचा शोध पोलिस घेत आहेत. त्यामुळे संशयाची सुई रोजंदारी कर्मचाऱ्यांवरच फिरत असल्याचेही पोलिस सुत्रांकडून समजले. घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमलेली असताना रोजंदारी कर्मचाऱ्यांपैकी फक्त एक कर्मचारी गैरहजर असल्याने पोलिसांचा संशय वाढला आहे. याठिकाणी कार्यरत असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचे गेल्या एक वर्षापासून वेतन झाले नसल्याचेही येथील चर्चेत उघड झाले. वेतन करावे, या मागणीसाठी रोजंदारी कर्मचारी आणि कृषी पर्यवेक्षक यांच्यात अनेकवेळा खटके उडाले असल्याचीही माहिती तपासणीत आढळून आली.
ठसेतज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण
घटनास्थळी श्वान पथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. तेथे पडलेल्या कुऱ्हाड, विळे या वस्तूंना श्वानाला वास घेण्यास सांगितले. परंतु, त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. ठसेतज्ज्ञ व फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून बारकाईने नोंदी घेतल्या.
विच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात
घटनास्थळाची व मृतदेहाची तपासणी झाल्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. हिंगोली जिल्ह्यातीलच अधिकाऱ्याचा निर्दयीपणे खून झाल्याची घटना कळल्यानंतर सेनगाव, कळमनुरी, हिंगोली व बाळापूर येथून नातेवाइकांची घटनास्थळी व ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी जमा झाली आहे.
मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक रवाना
खून झाल्याची घटना लक्षात आल्यानंतर पोलिस पथक ॲक्शन मोडवर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मारेकऱ्याच्या शोधात रवाना झाले आहे. नांदेड जिल्ह्यात मारेकऱ्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.