मराठा आरक्षणासाठी मुंबईत गेलेल्या हिंगोलीच्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू; कुटुंबावर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 12:47 IST2025-09-05T12:46:32+5:302025-09-05T12:47:35+5:30
वाशी येथून आझाद मैदान येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात असताना रेल्वेतून पडून झाले होते गंभीर जखमी

मराठा आरक्षणासाठी मुंबईत गेलेल्या हिंगोलीच्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू; कुटुंबावर शोककळा
वसमत/कोठा (जि. हिंगोली) : मराठा आरक्षण आंदोलनासाठी मुंबई येथे सहभागी होण्यासाठी २७ ऑगस्टला वसमत तालुक्यातील बोराळा येथील मराठा आंदोलक गोपीनाथ सोनाजी जाधव गेले होते. २ सप्टेंबरला ते वाशी येथून आझाद मैदान येथे जात असताना रेल्वेतून पडले. यानंतर त्यांना उपचारांसाठी मुंबईत दाखल केले परंतु, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
गोपीनाथ जाधव (वय ५०) हे अल्पभूधारक शेतकरी असून, मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी ते आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबई येथे २७ ऑगस्टला गेले होते. त्यांनी आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभागही नोंदविला. २ सप्टेंबर रोजी जाधव हे वाशी येथून आझाद मैदानाकडे जात होते. दरम्यान, दुर्दैवाने ते रेल्वेतून पडले. सोबतच्या सहकाऱ्यांनी त्यांना 'केईएम' रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. रुग्णालयात त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र, उपचारांच्यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जाधव यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. गोपीनाथ जाधव यांच्या पार्थिवावर ५ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता बोराळा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.