अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकास तीन वर्षे सक्तमजुरी
By विजय पाटील | Updated: October 2, 2023 13:05 IST2023-10-02T13:02:17+5:302023-10-02T13:05:01+5:30
या प्रकरणात सहायक सरकारी वकीलांनी एकूण १३ साक्षीदार तपासले.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकास तीन वर्षे सक्तमजुरी
हिंगोली : शहरातील एका अल्पवयीन मुलीस विविध भागात फिरवून तिला मारहाण करीत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या युवकास तीन वर्षे सक्तमजुरी व २१ हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एन.माने-गाडेकर यांच्या न्यायालयाने सुनावली.
१४ जुलै २०२१ रोजी या अल्पवयीन मुलीस हर्ष ऊर्फ यश अंबादास आठवले याने पैसे व कपड्यांचे आमिष दाखवून या अल्पवयीन पळवून नेले. तिला आजम कॉलनी रोडकडील रामाकृष्णा हॉटेलच्या समोरील नवीन बांधकाम सुरू असलेला इमारतीत नेवून मारहाण केली. तिच्यावर नैसर्गिक व अनैसर्गिक अत्याचार केला. याबाबत पीडितेच्या आईने हिंगोली शहर पोलिसांत तक्रार दिल्यानंतर भादंविच्या विविध कलमांसह बाललैंगिक अत्याचार अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबतचा तपास सहायक पोलिस अधीक्षक यतिश देशमुख यांनी केला. त्यानंतर न्यायालयात विशेष खटला दाखल करण्यात आला. हे प्रकरण अप्पर सत्र न्यायाधीश श्रीमती एस.एन. माने-गाडेकर यांच्या न्यायालयात चालले. या प्रकरणात सहायक सरकारी वकील एन.एस. मुटकुळे यांनी एकूण १३ साक्षीदार तपासले. यात पीडिता व तपासिक अंमलदारांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.
यावरून आरोपी हर्ष याच कलम ३६३ व ५०६ अन्वये दोषी ठरवून तीन वर्षे सक्त कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास १ वर्षे साधा कारावास सुनावला. कलम ३२३ अन्वये सहा महिने सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड तर दंड न भरल्यास १५ दिवास कारावासाची शिक्षा सुनावली. तर कलम ८ व १२ बा.लैं.अ. कायदा या दोन्ही कलमांतर्गत प्रत्येकी तीन वर्षे सक्त कारावास व पाच हजार रुपये दंड तर दंड न भरल्यास एक महिना कारावास अशी शिक्षा सुनावली. सर्व शिक्षा सोबतच भोगावी, असा आदेश दिला. यात सरकार पक्षातर्फे एन.एस. मुटकुळे, एस.डी.कुटे, सविता देशमुख यांनी बाजू मांडली. तर कोर्टपैरवी सहायक फौजदार फेरोज शेख, मपोहे सुनीता शिंदे यांनी त्यांना सहकार्य केले.