पाण्याच्या टाकीसाठी खोदलेल्या खड्डयाने चिमुकलीचा घेतला जीव
By विजय पाटील | Updated: July 22, 2023 14:22 IST2023-07-22T14:22:12+5:302023-07-22T14:22:27+5:30
वटकळी येथील सरकारी दवाखान्याच्या बाजूला दीड महिन्यापूर्वी पाण्याची टाकी बसविण्यासाठी ग्रामपंचायतीने खड्डा खोदला होता.

पाण्याच्या टाकीसाठी खोदलेल्या खड्डयाने चिमुकलीचा घेतला जीव
वटकळी (जि. हिंगोली) : सेनगाव तालुक्यातील वटकळी येथे दीड महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीकडून पाण्याच्या टाकीचे कॉलम करण्यासाठी खड्डा केला होता. परंतु ही जागा रद्द करून नवीन ठिकाणी टाकी घेण्याचे ठरले तरीही हा खड्डा बुजला नाही. या खड्ड्यात पडून एका सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना २१ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.
वटकळी येथील सरकारी दवाखान्याच्या बाजूला दीड महिन्यापूर्वी पाण्याची टाकी बसविण्यासाठी ग्रामपंचायतीने खड्डा खोदला होता. परंतु ऐनवेळी तो खड्डा रद्द करुन दुसऱ्याच ठिकाणी खड्डा तयार केला. तेथे टाकीही उभारली. मात्र जुना खड्डा तसाच ठेवला. २१ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेदरम्यान या ठिकाणावरुन आरुषी संदीप याताळकर (वय ६) ही मुलगी कचरा घेऊन जात होती. दरम्यान तिला जातेवेळेस पाण्याने भरलेला खड्डा दिसला नाही. सदर मुलगी खड्ड्यात पडली. यावेळी तिच्या नाकातोंडात पाणी गेले. यामुळे तिचा जागेवरच मृत्यू झाला.
या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना घडताच ग्रामस्थांनी सेनगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी वटकळी येथे येवून पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत सदर घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. यावेळी जमादार शेख, पोलीस कर्मचारी मारकळ, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. अंकुश अंभोरे यांनी या मुलीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.