जुन्या भांडणातून एकावर खंजीरने हल्ला; आठ जणांवर गुन्हा दाखल
By विजय पाटील | Updated: April 27, 2023 14:39 IST2023-04-27T14:38:53+5:302023-04-27T14:39:12+5:30
गावात येताच जुन्या भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ करत केला हल्ला

जुन्या भांडणातून एकावर खंजीरने हल्ला; आठ जणांवर गुन्हा दाखल
हिंगोली: वसमत तालुक्यातील इंजनगाव येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून एकास खंजीरने मारहाण केली. छातीवर व डाव्या हातावर खंजीरने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी घडली. सध्या जखमीवर नांदेड येथे उपचार करण्यात येत आहेत.
इंजनगाव येथे २३ एप्रिल रोजी राजू विठ्ठल जाधव (वय २५) यास रोहीत जाधव, आनंद मुळे, बालाजी मुळे, महेंद्र मुळे, विजया जाधव, प्रवीण जाधव, अजय कोल्हे, भीमराव जाधव (सर्व रा. इंजनगाव) यांनी राजू गावात येताच जुन्या भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ केली. यावेळी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्याच्या छातीवर व डाव्या हातावर खंजीरने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मारहाणीत राजू जाधव हा जखमी झाला असल्याने नांदेड येथे उपचार चालू आहे. यापूर्वी २८ जानेवारी रोजी रोहीत व राजू यांच्यात मोबाइलवर हसण्याचा इमेज पाठविण्यावरून बाचाबाची झाली होती. याप्रकरणी २६ एप्रिल रोजी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आठ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.