सरकळी पाटीजवळ कार टेम्पोचा भीषण अपघात; एक ठार तर एक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 14:09 IST2022-05-20T14:09:07+5:302022-05-20T14:09:33+5:30
मृत आणि जखमी हे गुजरात येथील आहेत

सरकळी पाटीजवळ कार टेम्पोचा भीषण अपघात; एक ठार तर एक गंभीर जखमी
नर्सी नामदेव (जि. हिंगोली): हिंगोली ते सेनगाव राज्य रस्त्यावरील सरकळी पाटीजवळ आज सकाळी ७:४५ वाजेच्या सुमारास कार व टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारचा चालक ठार झाला तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे.
हिंगोली येथून सेनगावकडे ( जीजे-२७-एए- ०१८० ) या क्रमांकाची कार सेनगावकडे जात असताना टेम्पो (एमएच-२१-एक्स २३७५) या टेम्पोने कारला धडक दिली. हा अपघात सरकळी पाटीजवळ झाला. या अपघातामध्ये कारचालक मनोज देसाई (वय ४०, रा. जुनागड,गुजरात) हा ठार झाला आहे. तर राजभाई उसदलिया (वय ५२, रा. जुनागड, गुजरात) हे गंभीर जखमी झाले आहेट.
सदरील अपघाताची माहिती मिळताच सरकळी येथील ग्रामस्थांनी तातडीने जखमींना गाडीच्या बाहेर काढून हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. मात्र उपचारादरम्यान यामध्ये कारचालकाचा मृत्यू झाला. अपघात अतिशय भीषण असून यामध्ये कारच्या समोरील बाजूचा पूर्ण चेंदामेंदा झाला आहे. तर टेम्पोच्या पाठीमागील भागाचे नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच नर्सी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पुढील तपास नर्सी पोलिस ठाण्याचे पोलिस करीत आहेत. कारचा चेंदामेंदा झाल्याने जखमींना काढण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली होती.