शेती वाटणीच्या वादातून खून प्रकरणात ५ जणास जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 19:32 IST2022-03-23T19:31:48+5:302022-03-23T19:32:25+5:30
वसमत जिल्हा व सत्र न्यायलयाचा निकाल

शेती वाटणीच्या वादातून खून प्रकरणात ५ जणास जन्मठेप
वसमत ( हिंगोली ) : औंढा नागनाथ तालुक्यातील नांदखेडा गावात शेती वाटणीच्या कारणावरुन चाकुने भोसकुन एकाचा खून व दुसऱ्यास जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणी औंढा पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्यासह विविध कलमांन्वे ५ जणांवर गुन्हा दाखल केला होता. वसमत जिल्हा व सत्र न्यायलयाने १३ साक्षीदार तपासत २३ मार्च रोजी खून प्रकरणातील ५ आरोपींना जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील नांदखेडा येथे २३ जुलै २०१६ रोजी रात्री ७ वाजता मयत शिवाजी होनाजी कदम व फिर्यादी पंढरी कदम यांना, आरोपी गणेश योगाजी कदम, गोविंद गणेश कदम, शांताबाई गणेश कदम, राधाबाई गोविंद कदम, गोपाळ कदम यांनी शेती वाटणीच्या कारणावरुन लोखंडी चाकु, कुऱ्हाड, काठ्यांने मारहाण केली होती. मयत शिवाजी कदम यांच्या पोटात चाकुने वार करुन गंभीर जखमी करत खून केला होता. तसेच फिर्यादी पंढरी कदम यास जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात पंढरी कदम यांच्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलीस निरिक्षक एल. डी. केंद्रे, सपोनि गेडाम यांनी तपास करत दोषारोपत्र दाखल केले होते. या प्रकरणात १३ साक्षीदार तपासले. विशेष सरकारी वकील ॲड. सुभाष देशमुख यांनी आरोपींना शिक्षा द्यावी यासाठी युक्तीवाद केला. युक्तीवाद ग्राह्य धरुन जिल्हा व सत्र न्यायधीश उमाकांत देशमुख यांनी कलम ३०२ खाली ५ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व दंड थोटावला. या खून प्रकरणी सुनावणीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते.