29 stolen two-wheelers seized; One was taken into custody, the two absconded | चोरीला गेलेल्या २९ दुचाकी जप्त; एकाला घेतले ताब्यात, दोघे फरार

चोरीला गेलेल्या २९ दुचाकी जप्त; एकाला घेतले ताब्यात, दोघे फरार

हिंगोली : दुचाकी चोरून चेसिस क्रमांक व इंजिन क्रमांकावर खाडाखोड करून बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करणाऱ्या दुचाकी चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून पोलिसांनी २९ दुचाकी जप्त केल्या. याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून १० एप्रिल रोजी दुचाकी चोरीला गेली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला यातील आरोपी जिंतूर तालुक्यातील गडदगव्हाण येथे असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पथकाने सचिन ऊर्फ राजू रामा खिल्लारे (रा. गडदगव्हाण) याला ताब्यात घेतले. यावेळी सचिन खिल्लारे याने पांगरी येथील हरीदास व्यंकटीराम टापरे, अरविंद हरीदास टापरे या दोघांच्या मदतीने दुचाकी चोरून चेसिस नंबर व इंजिन नंबरची खाडाखोड करून बनावट कागदपत्रांच्या आधारे दुचाकी विक्री केल्याचे कबूल केले. पोलिसांनी आरोपीकडून १५ लाख ६५ हजार रुपये किमतीच्या २९ दुचाकी जप्त केल्या. यातील हरीदास टापरे दुचाकी चोरी करण्यात सराईत असून त्याच्यावर यापूर्वीही दुचाकी चोरीप्रकरणी गुन्हा नोंद आहे. पोलिसांनी सचिन ऊर्फ राजू रामा खिल्लारे याला न्यायालयासमोर उभे केले असता त्याला १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्याकडून आणखी दुचाकी मिळण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, हिंगोली ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. आर. बंदखडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक के. डी. पोटे, एस.एस. घेवारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बालाजी बोके, शंकर जाधव, विलास सोनवणे, अशोक धामणे, सुनील अंभोरे, विठ्ठल कोळेकर, संभाजी लेकुळे, भगवान आडे, शंकर ठोंबरे, राजू ठाकूर, किशोर कातकडे, विशाल घोळवे, ज्ञानेश्वर सावळे, किशोर सावंत, आकाश टापरे, विठ्ठल काळे, ज्ञानेश्वर पायघण, सुमित टाले, चालक शेख जावेद यांच्या पथकाने केली.

दुचाकी चोरटे निघाले मामा-भाचे
दुचाकी चोरट्यांनी चेसिस व इंजिन नंबरमध्ये खाडाखोड करून हिंगोली, नांदेड, औरंगाबादमध्ये प्रत्येकी २, वाशिममध्ये ३, परभणी, अकोला, बुलढाणा येथे प्रत्येकी १ आणि अन्य जिल्ह्यातून अशा एकूण २९ दुचाकी चोरल्या आहेत. तसेच याआधी गडदगव्हान, दाभा, जोडपरळी, टेभुर्णी, डिग्रस येथे दुचाकी विक्री केल्या आहेत. विशेष म्हणजे दुचाकी चोरटा हरीदास व्यंकटीराम टापरे हा आरोपी सचिन ऊर्फ राजू रामा खिल्लारे याचा मामा आहे.

Web Title: 29 stolen two-wheelers seized; One was taken into custody, the two absconded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.