धोक्याची घंटा! आता आला ह्यूमन कोरोना व्हायरस HKU1; शिंकण्यामुळे प्रसार, 'ही' आहेत लक्षणं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 12:23 IST2025-03-17T12:23:34+5:302025-03-17T12:23:57+5:30
एका ४५ वर्षीय महिलेमध्ये ह्यूमन कोरोना व्हायरस HKU1 (HCoV-HKU1) आढळून आला आहे.

धोक्याची घंटा! आता आला ह्यूमन कोरोना व्हायरस HKU1; शिंकण्यामुळे प्रसार, 'ही' आहेत लक्षणं
कोलकाता येथील एका ४५ वर्षीय महिलेमध्ये ह्यूमन कोरोना व्हायरस HKU1 (HCoV-HKU1) आढळून आला आहे. गेल्या १५ दिवसांपासून तिला ताप, खोकला आणि सर्दी होती आणि आता ती कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. महिलेची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचं कारण नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
ह्यूमन कोरोना व्हायरस HKU1 प्रामुख्याने श्वसनसंस्थेवर परिणाम करतो आणि सामान्य सर्दीसारख्या समस्या निर्माण करतो. परंतु काही प्रकरणांमध्ये न्यूमोनिया किंवा ब्राँकायटिससारखे गंभीर फुफ्फुसांचे आजार होऊ शकतात. या व्हायरसबद्दल जागरूक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे जेणेकरून वेळेवर खबरदारी घेता येईल.
ह्यूमन कोरोना व्हायरस HKU1 म्हणजे काय?
HCoV-HKU1 हा बीटा कोरोना व्हायरस कुटुंबातील एक व्हायरस आहे, ज्यामध्ये SARS आणि MERS सारखे धोकादायक व्हायरस देखील समाविष्ट आहेत. ते COVID-19 (SARS-CoV-2) इतके गंभीर नाहीत मात्र श्वसन संक्रमणांना कारणीभूत ठरतात.
HCoV-HKU1 ची लक्षणं
बहुतेक प्रकरणांमध्ये सौम्य लक्षणं असतात आणि रुग्ण उपचारांशिवाय बरा होतो, परंतु वृद्ध, मुलं आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांमध्ये संसर्ग गंभीर असू शकतो. या व्हायरसमुळे सहसा फ्लू किंवा सामान्य सर्दी सारखी लक्षणं दिसून येतात.
- सततचा खोकला
- नाक गळणे
- घसा खवखवणे
- ताप
- शिंका येणे
- थकवा आणि अशक्तपणा
- डोकेदुखी
- गंभीर प्रकरणांमध्ये श्वास घेण्यास त्रास होणे आणि न्यूमोनिया किंवा ब्राँकायटिस
कोणाला जास्त धोका?
जरी हा व्हायरस COVID-19 इतका धोकादायक नसला तरी, काही लोकांसाठी तो अधिक धोकादायक असू शकतो.
- ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक
- नवजात बाळ आणि लहान मुलं
- दमा, सीओपीडी सारख्या फुफ्फुसांच्या आजारांनी ग्रस्त रुग्ण
- कमकुवत प्रतिकारशक्ती असलेले लोक (जसे की कॅन्सरचे रुग्ण, अवयव प्रत्यारोपण केलेले रुग्ण, एचआयव्ही/एड्सचे रुग्ण)
- मधुमेह किंवा हृदयरोगाने ग्रस्त असलेले लोक
HCoV-HKU1 कसा पसरतो?
- संक्रमित व्यक्तीच्या खोकल्यामुळे किंवा शिंकल्याने बाहेर पडणाऱ्या थेंबांच्या संपर्कात येणं
- दूषित पृष्ठभागांना (जसं की मोबाईल, दाराचे हँडल) स्पर्श केल्यानंतर चेहरा, तोंड किंवा नाकाला स्पर्श करणं.
- संक्रमित व्यक्तीच्या जवळ असणं. (जसं की कुटुंबात किंवा गर्दीच्या ठिकाणी)
कसा करायचा बचाव?
सध्या या विषाणूसाठी कोणतीही लस किंवा विशिष्ट उपचार नाही, परंतु मूलभूत खबरदारी घेतल्यास संसर्गाचा धोका कमी करता येतो.
-वारंवार हात धुवा.
- गर्दीच्या ठिकाणी मास्क घाला.
- संक्रमित लोकांपासून अंतर ठेवा.
- वारंवार स्पर्श होणारे पृष्ठभाग (जसे की मोबाईल फोन, टेबल, दाराचे हँडल) निर्जंतुक करा.
- शिंकताना किंवा खोकताना तुमचे तोंड आणि नाक झाका.
- तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी पौष्टिक अन्न घ्या.
- भरपूर पाणी प्या आणि पुरेशी झोप घ्या.