निरोगी राहण्यासाठी जेवणाची योग्य वेळ कोणती? 'हे' माहीत नसेल तर पडू शकतं महागात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 15:07 IST2024-08-03T15:05:25+5:302024-08-03T15:07:23+5:30
Eating Timing Tips : तुम्हाला नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ माहीत असली पाहिजे. याबाबतच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

निरोगी राहण्यासाठी जेवणाची योग्य वेळ कोणती? 'हे' माहीत नसेल तर पडू शकतं महागात!
Eating Timing Tips : आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर आहाराची पौष्टिकता आणि आहाराचं प्रमाण या दोन्ही गोष्टी महत्वाच्या ठरतात. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण यानेच अन्न पचनाची क्रिया योग्यपणे होते. सोबतच जेवणाची वेळही फारच महत्वाची असते. कारण या वेळेवरच तुमचं मेटाबॉलिज्म अवलंबून असतं. चुकीच्या वेळेवर जेवण केल्याने केल्याने आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशात तुम्हाला नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ माहीत असली पाहिजे. याबाबतच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
नाश्ता आणि जेवणाची योग्य वेळ
सकाळचा नाश्ता
सकाळचा नाश्ता हा दिवसभरातील संपूर्ण आहाराचा महत्वाचा भाग असतो. नाश्ता केल्याने तुम्हाला दिवसभरातील कामे करण्यासाठी ऊर्जा मिळते. एक्सपर्टनुसार, सकाळी झोपेतून उठल्यावर ७ ते ८ वाजता दरम्यान किंवा ९ वाजताच्या आधी नाश्ता करायला हवा. फार फार तर तुम्ही १० वाजेपर्यंत नाश्ता करायला हवा. नाश्त्यात प्रोटीन आणि फ्रूट्सचं सेवन करावं. फोडणीचा भात किंवा रात्री शिल्लक राहिलेल्या चपात्यांचा चिवडा देखील आरोग्यदायी असतो.
दुपारचं जेवण
सकाळचा नाश्ता केल्यावर जवळपास ४ तासांनी दुपारचं जेवण करावं. याने ब्लड ग्लुकोज संतुलित राहतं. अनावश्यक भूक किंवा क्रेविंग मॅनेज होते. दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत आणि जास्तीत जास्त ३ वाजेपर्यंत जेवण उरकायला हवं. दुपारच्या जेवणात भाजी, चपाती, भात, डाळी यांचा समावेश असावा.
रात्रीचं जेवण
जास्तीत जास्त एक्सपर्ट हाच सल्ला देतात की, रात्रीचं जेवण हे नेहमी झोपण्याच्या दोन तास आधी करावं. अंधार होताच शरीराची सरकेडिअन सायकल अॅक्टिव होते. मेलाटोनिनचं प्रमाण वाढतं आणि पॅंक्रियाची सक्रियताही कमी होते. रात्री उशीरा जेवण केल्याने ब्लड शुगर वाढण्याचाही धोका असतो. सोबतच वजनही वाढू शकतं. त्यामुळे रात्रीचं जेवण ७ ते ८ वाजता दरम्यान करण्याचा प्रयत्न करावा.
जेवणानंतर लगेच करू नका 'या' चुका
लगेच झोपू नये
बरेच लोक जेवण केल्यावर लगेच झोपतात. पण ही एक मोठी चूक आहे. कारण यामुळे तुम्हाला अॅसिडिटी आणि पोटासंबंधी इतर समस्या होऊ शकतात. छातीत जळजळ आणि पोटदुखीही होऊ शकते. तसेच जेवल्यावर लगेच झोपल्याने पचनही चांगलं होत नाही.
लगेच फोन हाती घेणे
जेवण केल्यावर लगेच फोन बघायला सुरूवात करणंही नुकसानकारक आहे. जास्तीत जास्त लोकांना ही सवय असते. ते जेवण झालं की, लगेच बेड किंवा सोफ्यावर बसून फोन बघतात. यामुळे पचनास समस्या होते आणि पोट बाहेर येण्याची समस्या होते.
चहा किंवा कॉफी
बऱ्याच लोकांना जेवण केल्यावर लगेच चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. जेवण केल्यावर चहा किंवा कॉफी प्यायल्याने अॅसिडिक रिफ्लक्सची समस्या होते. यामुळे छातीत जळजळ आणि पोट खराब होतं.
लगेच कामाला सुरूवात
बरेच लोक ऑफिसमध्ये जेवण केल्यावर लगेच कामाला लागतात. असं करणं चुकीचं आहे. जेवण केल्यावर काही वेळ चालावं त्यानंतर काम करावं. असं केल्याने तुमचं वजन वाढणार नाही.