Walk home for six minutes; Check your lung health! | घरातल्या घरात सहा मिनिटे चाला; अन् फुप्फुसांचे आराेग्य तपासा! 

घरातल्या घरात सहा मिनिटे चाला; अन् फुप्फुसांचे आराेग्य तपासा! 



लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुप्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का, याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी आरोग्य विभागाने भर दिला असून, त्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी केले.
राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत डॉ. व्यास यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेला सहा मिनिटे चालण्याच्या चाचणीबाबत अधिक जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. यामुळे नागरिकांना रक्तातील ऑक्सिजनची लपलेली कमतरता लक्षात येईल, जेणेकरून गरजू रुग्णाला वेळेवर रुग्णालयात दाखल करणे शक्य होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

अशी करावी चाचणी
nचाचणी करण्यापूर्वी बोटाला पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावरील ऑक्सिजनची नोंद करावी. त्यानंतर ऑक्सिमीटर तसेच बोटात ठेवून घरातल्या घरात सहा मिनिटे चालावे (पायऱ्यांवर चालू नये). यादरम्यान अतिवेगात किंवा हळूहळू चालू नये तर मध्यम चालावे. सहा मिनिटे चालून झाल्यानंतर पुन्हा ऑक्सिजनच्या पातळीची नोंद घ्यावी.
nसहा मिनिटे चालूनही ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले नाही तर तब्येत उत्तम, असे समजावे. समजा ऑक्सिजन एक ते दोन टक्क्यांनी कमी होत असेल तर काळजी न करता दिवसातून पुन्हा दोन वेळा अशीच चाचणी करावी जेणेकरून काही बदल होतो का, ते लक्षात येईल.

६० वर्षांहून अधिक वय असल्यास ३ मिनिटेच चाला
सहा मिनिटे चालल्यानंतर ऑक्सिजनची पातळी ९३ टक्क्यांपेक्षा कमी होत असेल, चालणे सुरू करण्यापूर्वी जी पातळी होती त्यापेक्षा ३ टक्क्यांपेक्षा जास्त घट होत असेल किंवा सहा मिनिटे चालल्यानंतर दम, धाप लागत असेल तर त्या व्यक्तीला ऑक्सिजन अपुरा पडतो आहे, असे समजून त्याला रुग्णालयात दाखल करावे. ज्यांना बसल्याजागीच धाप, दम लागतो त्यांनी ही चाचणी करू नये, ६० वर्षांहून अधिक वय असलेले फक्त ३ मिनिटे चालून ही चाचणी करू शकतात.

चाचणी कोणी करावी?
ताप, सर्दी, खोकला अथवा कोरोनाची लक्षणे जाणवणारे व्यक्ती तसेच होम आयसोलेशनमध्ये असणारे रुग्ण ही चाचणी करू शकतात.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Walk home for six minutes; Check your lung health!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.