भेसळयुक्त खव्यापासून बनवलेले पदार्थ खाल्ल्याने होतात 'हे' गंभीर त्रास, असा ओळखा शुद्ध खवा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 17:34 IST2022-08-14T17:26:58+5:302022-08-14T17:34:36+5:30
आज आम्ही तुम्हाला शुद्ध आणि भेसळयुक्त खव्यामध्ये काय फरक असतो याबद्दल माहिती देणार आहोत. खाली दिलेल्या काही टिप्सच्या आधारे तुम्ही शुद्ध खवा आणि भेसळयुक्त खवा यांच्यातील फरक ओळखू शकता.

भेसळयुक्त खव्यापासून बनवलेले पदार्थ खाल्ल्याने होतात 'हे' गंभीर त्रास, असा ओळखा शुद्ध खवा...
सध्या श्रावण महिना सुरु आहे. श्रावण महिन्यात अनेक सण असतात, उपवास असतात आणि या सर्व प्रसंगी आपल्याकडे एक पदार्थ नक्की असतो तो म्हणजे कोणताही गोड पदार्थ. हे गोड मोठ्या प्रमाणात खव्यापासून बनवले जातात. सध्या बाजारातून मिठाईची खरेदी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने केली जाते. मात्र तुम्हाला माहीत आहे का की या सणासुदीच्या काळात बाजारात भेसळयुक्त मिठाई किंवा भेसळयुक्त खव्याचा धंदाही झपाट्याने वाढतो आहे.
त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला शुद्ध आणि भेसळयुक्त खव्यामध्ये काय फरक असतो याबद्दल माहिती देणार आहोत. खाली दिलेल्या काही टिप्सच्या आधारे तुम्ही शुद्ध खवा आणि भेसळयुक्त खवा यांच्यातील फरक ओळखू शकता.
अशी करा शुद्ध आणि भेसळयुक्त खव्याची ओळख
- खव्याचा एक छोटा तुकडा घेऊन अंगठा आणि बोटामध्ये थोडा वेळ दाबा किंवा रगडा. असे केल्यानंतर जर त्यात असलेल्या तुपाचा वास अंगठ्यावर बराच काळ राहिला तर तो खवा शुद्ध समजावा. नाहीतर तो खवा भेसळयुक्त आहे.
- खव्याचा छोटा तुकडा हातावर घ्या आणि त्याचा हाताच्या तळहातावर गोळा तयार करा. तुम्ही ते तळहातांमध्ये बराच वेळ फिरवत राहा. त्यानंतर मऊ गोळा तयार झाला तर तो खावा शुद्ध आहे आणि जर तो गोळा फुटायला लागला तर समजून घ्या की तो खवा भेसळयुक्त आहे.
- थोडे पाणी गरम करून त्यात 5 ग्रॅम खवा घाला. ते थंड झाल्यावर त्यात आयोडीनचे द्रावण टाका. यानंतर खव्याचा रंग निळा पडू लागला तर समजून घ्या की तो खवा भेसळयुक्त आहे.
- शुद्ध आणि भेसळयुक्त खाव्यात फरक ओळखण्यासाठी तुम्ही आणखी एक उपाय करू शकता. खवा तोंडात टाका. तोंडात टाकल्यानंतर जर खवा तोंडाला चिकटत असेल तर तो भेसळयुक्त खवा आहे. कारण खऱ्या खव्याची चव कच्च्या दुधासारखी असते आणि तो चिकटत नाही.
- खव्याची शुद्धता ओळखण्यासाठी आणखी एक मार्ग आहे. खव्याचा थोडा तुकडा पाण्यात टाकून फेटा. यानंतर त्याचे छोटे तुकडे झाले तर तो खवा भेसळयुक्त आहे आणि असा खवा खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते.
भेसळयुक्त खावा खाल्ल्याने होतात हे दुष्परिणाम
भेसळयुक्त खव्यापासून बनवलेली मिठाई खाल्ल्यास विषबाधा, उलट्या, पोटदुखी आदी समस्या उद्भवू शकतात, असे डॉक्टरांचे मत आहे. भेसळयुक्त खव्यापासून बनवलेल्या मिठाईमुळे आपल्या किडनी आणि यकृतावर परिणाम होतो आणि पचनक्रियाही बिघडते. त्यामुळे पोटाशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते. या मिठाई खाल्ल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधा.