देशभरात वाढला ‘सायलेंट किलर’चा धोका ! मुलांमध्ये बीपीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 14:16 IST2025-11-06T14:15:23+5:302025-11-06T14:16:48+5:30
सर्वेक्षणात हे प्रमाण ७.५ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे निरिक्षण

देशभरात वाढला ‘सायलेंट किलर’चा धोका ! मुलांमध्ये बीपीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: पूर्वी केवळ प्रौढांमध्ये आढळणारा उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर) आता मुलांनाही ग्रासू लागला आहे. अलीकडील संशोधनांनुसार देशातील ६ ते १८ वयोगटातील शालेय मुलांमध्ये हायपरटेन्शनचे आणि हाय ब्लड प्रेशरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मध्य भारतातील एका अभ्यासात सुमारे १.४ टक्के किशोरांमध्ये उच्च रक्तदाब आढळला आहे. तर महाराष्ट्रातील १० शाळांमधील २६०० हून अधिक विद्यार्थ्यांवर झालेल्या सर्वेक्षणात हे प्रमाण ७.५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.
सामान्य वजनाच्या मुलांनाही त्रास
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, उच्च रक्तदाब ही समस्या फक्त लठ्ठ किंवा स्थूल असणाऱ्या मुलांमध्येच आढळते असे नाही, तर तर सामान्य वजनाच्या सुमारे ५ टक्के मुलांमध्येही रक्तदाब वाढलेला आढळून आला आहे.
हृदय व मूत्रपिंडावर होतोय परिणाम
अनेकदा मुलांमध्ये हायपरटेन्शनची लक्षणे स्पष्टपणे दिसत नाहीत. त्यामुळे हे आजारपण ‘सायलेंट किलर’ ठरत असून, हळूहळू हृदय आणि मूत्रपिंडावर परिणाम करू लागते. अभ्यासांनुसार, उच्च रक्तदाब असलेल्या सुमारे ४० टक्के मुलांच्या हृदयाच्या रचनेत सुरुवातीचे बदल दिसून आले आहेत.
रक्तदाब का वाढतोय?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वाढती निष्क्रिय जीवनशैली, जास्तीचा स्क्रीन टाइम, ताणतणाव, झोपेची कमतरता आणि असंतुलित आहार ही या वाढत्या रक्तदाबाची प्रमुख कारणे आहेत. अधिक मीठ, तळलेले व प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ मुलांच्या रक्तदाबाला धोकादायक पातळीवर नेत आहेत. विशेषज्ञांनी सुचवले आहे की, शाळांमध्ये नियमित आरोग्य तपासणीसह बीपी मापन अनिवार्य केले पाहिजे. वेळेवर निदान आणि जीवनशैलीतील बदल केल्यास या ‘सायलेंट किलर’पासून मुलांचे भविष्य सुरक्षित ठेवता येऊ शकते.