आजाराची अबोल भाषा: आवाजातील बदल हे ईएनटी समस्यांचे प्राथमिक लक्षण असू शकते का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 16:15 IST2025-04-17T16:13:37+5:302025-04-17T16:15:36+5:30
Health : काहीवेळा आवाजाच्या गुणवत्तेतील सूक्ष्म बदल देखील काही सखोल सिस्टिमिक किंवा न्यूरॉलॉजिकल समस्यांचे प्राथमिक सूचक असू शकतो.

आजाराची अबोल भाषा: आवाजातील बदल हे ईएनटी समस्यांचे प्राथमिक लक्षण असू शकते का?
(डॉ शमा कोवळे, कन्सल्टन्ट, ईएनटी सर्जन, व्हॉईस अँड स्वॉलोइंग स्पेशालिस्ट, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मुंबई)
Health : तुमचा आवाज तुमचे म्हणणे दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे साधन तर आहेच पण त्याहीपेक्षा मोठे म्हणजे हे तुमच्या एकंदरीत आरोग्याचे एक ठळक प्रतिबिंब आहे. यंदाच्या वर्षी जागतिक आवाज दिनाची संकल्पना आहे "एम्पॉवर युअर व्हॉइस!" आवाज हे केवळ अभिव्यक्तीचे साधन नाही तर एक प्रभावी डायग्नोस्टिक टूल आहे ही जागरूकता निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे. आवाजात खरखर येणे किंवा थकल्यासारखा आवाज येणे म्हणजे घशात संसर्ग किंवा खूप जास्त बोलल्याचा, ओरडल्याचा परिणाम असा सर्वसामान्य समज असतो. पण काहीवेळा आवाजाच्या गुणवत्तेतील सूक्ष्म बदल देखील काही सखोल सिस्टिमिक किंवा न्यूरॉलॉजिकल समस्यांचे प्राथमिक सूचक असू शकतो.
आवाज: तुमच्या आरोग्याकडे पाहण्याची खिडकी
आवाजाचे विकार म्हणजे अति ताण, संसर्ग किंवा आवाजाची चुकीची तंत्रे यांचा परिणाम असा सर्वसामान्य समज असतो. आवाजामध्ये सातत्याने बदल होत असतील आणि ते तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून असतील तर कान, नाक आणि घसा यांच्याशी संबंधित आणि त्याही व्यतिरिक्त इतर गंभीर आरोग्य समस्यांचे हे सूचक असू शकते. मऊ, एकसुरी आवाज हे पार्किन्सन्स आजाराचे एक अगदी सुरुवातीचे लक्षण असू शकते, पार्किन्सन्सच्या सर्वांना माहिती असलेल्या मोटर लक्षणांच्याही आधी आवाजामध्ये बदलातून या आजाराची सूचना दिली जाते. एन्डोकनाबिनॉइड सिस्टिमप्रमाणे हायपोथायरॉइडिजममुळे देखील स्वर रज्जूला देखील सूज येऊ शकते, त्यामुळे आवाज खोल जाऊ शकतो किंवा कर्कश आवाज येऊ लागतो.
हृदय आणि रक्तवाहिन्यांमध्ये काही समस्या उत्पन्न झाल्यास त्याचा परिणाम तुमच्या आवाजावर होऊ शकतो. उदाहरणार्थ, जेव्हा हृदय प्रसरण पावते किंवा एओर्टिक अनेयुरिसम असतो, तेव्हा ऑर्टनर्स सिंड्रोम होतो. यांच्यापैकी काहीही जेव्हा होते तेव्हा हृदयाला रिकरंट लॅरिंजियल नर्व्हवर दाबावे लागते, त्यामुळे बोलताना श्वासासोबत अधिक हवा जाणवते, त्यामुळे आवाज हलका किंवा अस्पष्ट वाटतो. रुमेटोईड आर्थरायटिस आणि ल्युपस यासारख्या ऑटोइम्युन आजारामुळे स्वरयंत्रातील पोकळीजवळ (लॅरिन्क्स) सूज, जळजळ होऊ शकते आणि त्यामुळे बोलताना त्रास होतो, थकवा जाणवतो. गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स आजारामुळे (GERD) देखील आवाज बदलतो, कारण ही पचनाशी संबंधित समस्या आहे, आम्लामुळे स्वर रज्जुला त्रास होऊन आवाज बदलू शकतो. काहीवेळा आवाजामध्ये सततची खरखर, अस्पष्ट आवाज हे थायरॉईडचे, फुफ्फुसांच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते, खासकरून जर त्या व्यक्तीला गिळताना त्रास होत असेल किंवा इतर विशेष काही कारण नसताना वजन कमी होत असेल तर हे गंभीर लक्ष असू शकते. आवाजाविषयी, आवाजामध्ये कोणताही सूक्ष्म बदल का होतो याविषयी जागरूकता खूप आवश्यक आहे. तुमच्या आवाजातून तुमचे शरीर एखाद्या अजून जास्त गंभीर समस्येविषयी सांगत असण्याची शक्यता असते.
मन-शरीर-आवाज कनेक्शन
तुमचा आवाज तुमचे मन आणि भावना दर्शवतो. चिंता, ताण आणि नैराश्य यामुळे आवाज आणि स्वरांमध्ये बदल होऊ शकतो. बऱ्याच लोकांना स्नायूंच्या ताणाच्या डिसफोनियाचा त्रास असतो, खरेतर त्यांचे स्वरयंत्र आणि स्वरपटल सामान्यपणे काम करत असते; पण मान आणि खांद्यावर ताण आल्याने तणाव वाढतो. थरथरणारा किंवा ताणलेला आवाज किंवा फ्लॅट टोन त्याप्रसंगी बोलल्या जात असलेल्या शब्दांइतकेच तुमचे मानसिक अनारोग्य स्पष्टपणे दर्शवतो. मन-शरीर-आवाज यांच्यातील हे कनेक्शन आवाजातील बदल हे भावनिक ताणतणाव आणि मानसिक थकव्याचे अगदी सुरुवातीचे सूचक असू शकते, खासकरून अति ताण देणाऱ्या परिस्थितींमध्ये!
माहिती: जागरूकतेतून सक्षमता
आवाजातून आजारांचे निदान करता येऊ शकते ही बाब जरी खरी असली तरी अनेक लोक आवाजातील बदल हे काही सामान्य त्रासामुळे असतील असे समजून त्याकडे दुर्लक्ष करतात, त्यासाठी वैद्यकीय सल्ला घेत नाहीत किंवा खूप उशिराने घेतात. हे दुर्लक्ष किंवा विलंब यामुळे अनेक गंभीर आजार खूप सुरुवातीला लक्षात येऊ शकत नाहीत. लॅरिन्गोलॉजिस्ट आणि आवाजाची देखभाल करणारे प्रोफेशनल म्हणून लोकांना आवाजाच्या आरोग्याचे महत्त्व सांगून जागरूक करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे.
शाळा, कार्यालये आणि समुदायांमध्ये विशेष कार्यक्रम राबवून, खूप जास्त धोक्याच्या कक्षेमध्ये असलेल्या शिक्षक, परफॉर्मर्स, व्याख्याते, वक्ते आणि कॉल सेंटर कर्मचारी इत्यादींना जागरूक करणे आवश्यक आहे. या प्रोफेशनल व्हॉइस युजर्सना आवाजाचे आरोग्य योग्य राखण्याच्या विविध उपायांची माहिती दिली गेली पाहिजे, जसे की, पुरेसे पाणी पिणे, घसा खाकरणे टाळणे, बैठक/उभे राहण्याची पद्धत योग्य ठेवणे, आवाजाला आराम देणे आणि आवाजावरील ताण कमी करण्यासाठी श्वासोच्छवासाची तंत्रे स्वीकारणे.
निरोगी आवाज, निरोगी शरीर
जागतिक आवाज दिवस आपल्याला आठवण करून देतो की, स्वतःचा आवाज फक्त वापरू नका, तर तो नीट ऐका देखील. आवाजात सातत्याने खरखर येणे, आवाजात थकवा येणे, पिचमधील बदल किंवा बोलताना त्रास होणे या फक्त समस्या नाहीत तर तुम्ही शरीराकडे गंभीरपणे लक्ष द्यावे यासाठी तुमच्या शरीराने तुम्हाला दिलेली हाक आहे. आवाज निरोगी असेल तर तुम्ही स्वतःला प्रभावीपणे अभिव्यक्त करू शकता, इतरांशी संवाद, संबंध जोडू शकता आणि स्वतःची ओळख बनवू शकता, इतकेच नव्हे तर तुमचा आवाज एखाद्या छुप्या आजाराचा इशारा देखील देऊ शकतो.
यंदाच्या जागतिक आवाज दिनी आवाजाचा आनंद साजरा करा, इतकेच नव्हे तर त्याचे महत्त्व ओळखा, तुमच्या संपूर्ण आरोग्याशी आवाजाचे नाते समजून घ्या, स्वतःला आणि आजूबाजूच्या सर्वांना आवाजाची योग्य काळजी घेण्याबाबत माहिती द्या, स्वतःचा आवाज जाणीवपूर्वक ऐका आणि त्यातून दिल्या जाणाऱ्या आरोग्याबाबतच्या सूचना समजून घ्या.