४० वर्षांखालील तरुणांमध्येही वाढतोय पार्किन्सनचा धोका; भारतात १२ लाख रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 14:48 IST2026-04-11T14:46:24+5:302026-04-11T14:48:44+5:30
Nagpur : जगात सुमारे १ कोटी २० लाख तर भारतात १२ लाखाच्यावर लोक पार्किन्सन या आजाराने ग्रस्त आहेत. हा आजार प्रामुख्याने ६५ वर्षावरील व्यक्तींमध्ये दिसतो.

The risk of Parkinson's is increasing even among young people under 40; 1.2 million patients in India
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगात सुमारे १ कोटी २० लाख तर भारतात १२ लाखाच्यावर लोक पार्किन्सन या आजाराने ग्रस्त आहेत. हा आजार प्रामुख्याने ६५ वर्षावरील व्यक्तींमध्ये दिसतो; मात्र, आता ४० वर्षांखालील तरुणांमध्येही याचे प्रमाण वाढत आहे, अशी माहिती वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीचे विश्वस्त पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली. ११ एप्रिल हा दिवस 'जागतिक पार्किन्सन दिन' म्हणून पाळला जातो. त्यानिमित्ताने शुक्रवारी त्यांनी ही माहिती दिली.
आधुनिक उपचारपद्धती आणि आशेचा किरण
लंडनमधील मूव्हमेंट डिसऑर्डर तज्ज्ञ डॉ. कैलाश भाटिया यांच्या मते, वैद्यकीय क्षेत्र अशा टप्प्यावर आहे जिथे नवीन औषधांमुळे आजाराचा वेग मंदावणे शक्य झाले आहे. मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. धृव बत्रा यांनी स्पष्ट केले की, हा आजार पूर्ण बरा होत नसला तरी योग्य औषधोपचारांनी रुग्ण सामान्य जीवन जगू शकतो.
औषधांचा परिणाम कमी झाल्यास 'डीप ब्रेन स्टिम्युलेशन'सारखी शस्त्रक्रिया वरदान ठरू शकते. रुग्णांनी 'स्टेम सेल थेरपी'सारख्या प्रयोगांपासून दूर राहावे.
सुरुवात पोटापासून
पार्किन्सनची सुरुवात पोटापासून होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा आणि साखर, फास्ट फूड टाळावे. नियमित व्यायाम करावा.
२५ टक्के निदान चुकीचे
पार्किन्सन हा मेंदूचा विकार असून, यात शरीराच्या हालचालींवर नियंत्रण राहत नाही. हाता-पायांना कंप सुटणे, हालचालीत संथपणा, स्नायू कडक होणे, चालताना तोल जाणे, बोलण्यात बदल होणे ही लक्षणे आहेत. या आजाराचे निदान प्रामुख्याने वैद्यकीय तपासणीतून होते; यासाठी अनेकदा एमआरआयचीही गरज भासत नाही. सुरुवातीची लक्षणे न ओळखली गेल्यामुळे २५ टक्के रुग्णांचे निदान चुकीचे होत डॉ. मेश्राम म्हणाले.