(Image Credit : pharmaquotes.com)
फिट राहण्यासाठी लोक अलिकडे नको नको ते करत असतात. पण तुम्हाला फिट रहायचं असेल तर जिममध्ये जाण्याची काहीच गरज नाहीये. असं आम्ही नाही तर टाइम मॅगझिन द्वारे करण्यात आलेल्या एका सर्व्हेत सांगण्यात आलं आहे. या सर्व्हेनुसार, सर्वात जास्त जगणारे लोक कधीच जिममध्ये जाऊन घाम गाळत नाहीत.
२०१८ मध्ये टाइम मॅगझिनने Blue Zones नावाचा एक सर्व्हे केला होता. हा तो झोन आहे ज्यात लोक सर्वात जास्त जगतात. यात Okinawa (Japan), Sardinia (Italy), Nicoya (Costa Rica), Icaria (Greece) यांसारख्या भागात राहणाऱ्या लोकांचा समावेश आहे.
या लोकांवर करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, येथील लोक कधीच जिममध्ये जात नाहीत. तसेच मॅरेथॉनमध्येही भाग घेत नाहीत. जिमऐवजी हे लोक गार्डनिंग, पायी चालणे, घर आणि बाहेरील कामांसाठी मशीनचा वापर न करता हाताने करणे इत्यादी गोष्टींना प्राधान्य देतात.
या रिसर्चमधून असं सांगण्यात आलं आहे की, ज्या लोकांना निरोगी रहायचंय आणि जास्त जगायचंय त्यांनी या लोकांसारखी लाइफस्टाईल फॉलो करावी. आजपासून १०० वर्षांपूर्वी पाहिलं तर ९० टक्के लोक पायी चालणे किंवा जास्तीत जास्त शारीरिक हालचाल होईल अशा कामांमध्ये सक्रिय असायचे. पण आजकाल केवळ १० टक्के लोकच असं करतात.
तुम्हालाही फिट रहायचं असेल तर मुलांना शाळेत सोडायला चालत जाणे, छोट्या छोट्या कामांसाठी गाडीचा वापर करू नये, शक्य तिथे पायी चालत जाणे, या गोष्टी करू शकता. तज्ज्ञ सांगतात की, सर्वात चांगला पर्याय म्हणजे कमीत कमी १५ मिनिटे चालावे.
American Cancer Society नुसार, आठवड्यातून ६ तास वॉक केल्याने कॅन्सर तसेच हृदयासंबंधी आजाराचा धोका कमी राहतो. इतकेच नाही तर पायी चालण्याने आपला मेंदूही निरोगी राहतो. त्यासोबतच पायी चालल्याने डिमेंशिया हा मानसिक आजार होण्याची धोकाही ४० टक्के कमी होतो.
मुळात आपलं शरीर हे चालण्याच्या म्हणजे मुव्ह करण्याच्या हिशोबाने बनलं आहे. त्यामुळे जेवढं शक्य असेल तेवढं चालावं. याचा अर्थ असाही आहे की, जास्त आयुष्य जगण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी तुम्हाला जिममध्ये जाऊन घाम गाळण्याची गरज नाही.