विशेष लेख: लहानपणी वयानुसार वाटणारी भीती स्वाभाविक, पण मुले अंधाराला का भितात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 08:52 IST2025-03-23T08:51:59+5:302025-03-23T08:52:20+5:30

सतत आतून वाटणारी भीती वा अस्वस्थ असणाऱ्या मुलांमध्ये कुठली लक्षणे जाणवतात, वाचा सविस्तर

Special Article on Childhood fears are natural, but why are children afraid of the dark | विशेष लेख: लहानपणी वयानुसार वाटणारी भीती स्वाभाविक, पण मुले अंधाराला का भितात?

विशेष लेख: लहानपणी वयानुसार वाटणारी भीती स्वाभाविक, पण मुले अंधाराला का भितात?

डॉ. विद्याधर बापट, मानसोपचारतज्ज्ञ

लहानपणी वयानुसार वाटणारी स्वाभाविक भीती म्हणजे-अगदी लहान बाळांना अनोळखी त्रयस्थ व्यक्तीची वाटणारी भीती, दहा महिने ते दीड वर्ष या वयात आई किंवा वडील आपल्यापासून दूर होताना, जाताना  बाळाचं अस्वस्थ होणं, वय वर्षे चार ते सहादरम्यान वाटणारी गोष्टीतल्या भूतांची, राक्षसांची भीती तसेच अंधाराची भीती, साधारण सात ते दहा या वयात आजूबाजूच्या घडणाऱ्या वास्तव प्रसंग, उदा. मृत्यू, अपघात, घातपात व दहशतवादाच्या बातम्या, चित्रे, दृश्य यांची भीती. या सगळ्या भीती कालांतराने नाहीशा होणं गरजेचं असतं. पण काही अतिसंवेदनाशील मुलांच्या बाबतीत काही भीती वा अस्वस्थता व्यक्तिमत्त्वातील असुरक्षिततेचं कारण ठरू शकतात. उदा. शाळेत वर्गात इतर मुलांकडून झालेली टिंगल, शिक्षकांनी चूक नसताना केलेली हेटाळणी, तुला काहीच जमत नाही, जमणार नाही अशी शिक्षक, नातेवाईक यांच्याकडून सतत केली गेलेली नकारात्मक टिप्पणी यातून निर्माण होणारा न्यूनगंड, आपण निरुपयोगी असल्याची भावना पुढे मुलांच्या प्रगतीच्या आड येऊ शकते.

मोठेपणी सगळ्यांसमोर, समूहासमोर बोलताना वाटणाऱ्या भीतीचं मूळ लहानपणी वर्गात मुलांकडून केल्या जाणाऱ्या टिंगलीत किंवा शिक्षकांनी सर्वांसमोर केलेल्या अपमानात असू शकतं. मुलींच्या बाबतीत नकळत्या वयात अनुभवले गेलेले गलिच्छ स्पर्श यांचाही निकोप विकासावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.

ज्या मुलांमध्ये अतिरिक्त अस्वस्थता जाणवते, त्यांच्या बाबतीत पुढील कारणे असू शकतात:

१. अनुवंशिकता : ही मुले अतिसंवेदनशील, हळवी असू शकतात. 
२. पालकांपैकी एकजण किंवा दोघेही अस्वस्थ वा असुरक्षित असतात. 
३. पालकांनी मुलांची अनाठायी किंवा अतिरिक्त काळजी घेण्यामुळे मुलांना वास्तवातल्या प्रसंगाला, संघर्षाला तोंड देण्याची क्षमता विकसित होत नाही. 
४. काहीवेळा मुलांच्या दृष्टीने निर्माण होणारे दुर्दैवी प्रसंग उदा. पालकांचा घटस्फोट, घरातील ज्येष्ठांचा मृत्यू, अपघात, घरातले मोठे आजारपण इ.

सतत आतून वाटणारी भीती वा अस्वस्थ असणाऱ्या मुलांमध्ये पुढील लक्षणे जाणवतात.

१. चंचलपणा, उतावळेपणा, मंद हालचाली, कमी झोप वा जास्त झोपणे, तळव्यांना सतत घाम 
२. नॉशिया, डोकेदुखी व पोटदुखीची तक्रार व त्यामुळे शाळेत न जाणे. 
३. अभ्यासात एकाग्रता न होऊ शकणे व मार्क्स कमी व्हायला लागणे.

मुलांची भीती घालविण्यासाठी पालकांनी नेमकं काय करायला हवं?

पालकांनी समजून घ्यायला हवं की, भीती आपल्यासाठी काल्पनिक असली तरी मुलाला ती खरी भासते. त्यामुळेच  त्याला अस्वस्थता येते. अशा स्थितीत खूप आश्वासक, प्रेमळ शब्दात त्याला समजावून सांगावं.त्याला रागावू नये किंवा त्याची चेष्टा करू नये. भीतीवर मात करण्यासाठी त्याला मदत करावी; काल्पनिक भीतीला खतपाणी घालू नये. उदा. रात्री झोपताना मुलांना दुसऱ्या खोलीत किंवा कपाटात भूत आहे, असं वाटतं. त्यावेळी मुद्दाम कपाट उघडून ‘बघ, आत काही भूतबीत नाहीय’ असं काही सांगू नये. कारण त्यामुळे भूत असतं; पण आता नाहीय असा अर्थ मुलं काढू शकतात. त्याऐवजी भूत नावाची गोष्टच नसते अशा पद्धतीनं  समजून सांगावे.

तसंच “अंधाराला घाबरण्यासारखं काही नसतं. अंधार म्हणजे फक्त प्रकाशाचा अभाव, प्रकाश नसणे”, असे समजावून सांगितले तर ते पटू शकेल. घराप्रमाणेच शाळेमध्येही मुलांना समजून घेणे, धैर्य देणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे या गोष्टी शिक्षक करू शकतात. मुलांचा बराचसा वेळ शाळेत जातो. शाळेत त्याला आश्वासक वातावरण मिळणे त्याच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने खूपच आवश्यक ठरते. लहानपणीच जर अनाठायी, काल्पनिक भीतीची मुळे खुडली गेली तर सकस व्यक्तिमत्त्वाचा वृक्ष भविष्यात बहरू शकतो.

Web Title: Special Article on Childhood fears are natural, but why are children afraid of the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.