चेहऱ्यावर हासू, हृदयात आसू; स्माइल डिप्रेशनचे कारण काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 18:04 IST2025-07-01T18:03:53+5:302025-07-01T18:04:40+5:30

मानसिक आजाराची भीती : डिप्रेशन हे मेंदूतील रासायनिक बदलांशी संबंधित स्थिती

Smile on your face, ache in your heart; What is the cause of smile depression? | चेहऱ्यावर हासू, हृदयात आसू; स्माइल डिप्रेशनचे कारण काय ?

Smile on your face, ache in your heart; What is the cause of smile depression?

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
चेहऱ्यावर सतत हास्य, बोलण्यात उत्साह, सामाजिकदृष्ट्या सक्रिय आणि मनमिळावू स्वभाव, पण याच व्यक्तीच्या हृदयात वेदनेची खोल नदी वाहत असते. ही अवस्था म्हणजेच स्माइल डिप्रेशन होय. समोरून पाहणाऱ्याला ती व्यक्ती आनंदी वाटते, पण आतून ती मानसिक संघर्ष, निराशा, एकटेपणा आणि थकलेली असल्याचे दिसते. या मानसिक आजाराची भीती एवढी आहे की, तो लपून राहतो आणि म्हणूनच अधिक घातक ठरतो.


'स्माइल डिप्रेशन' म्हणजे नेमके आहे तरी काय ?
स्माइल डिप्रेशन म्हणजे डिप्रेशनची ती अवस्था जिथे व्यक्ती चेहऱ्यावर आनंद दाखवते, पण आतून खचलेली असते. ती सामाजिकदृष्ट्या कार्यरत असते, नोकरी, दैनंदिन कामे, जबाबदाऱ्या सांभाळत असते, पण एकांतात गेल्यावर तिला खिन्नता, शून्यता, आत्मगंड, दुःख यांचा सामना करावा लागतो. हे दुखणं दिसणारे नसल्यामुळे अवस्थेतील व्यक्तींकडे अनेकदा दुर्लक्ष होते. अशावेळी कुटुंबियातील सदस्यांनी संबंधित रुग्णाशी चांगला संवाद साधावा.


तुम्ही या अवस्थेत आहात, कशी मात कराल ?

  • स्वतःशी प्रामाणिक राहावे. डोळस संवान साधावा, विश्वासार्ह मित्र, कुटुंबीय वा समुपदेशक यांच्याशी बोलावे. नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.
  • मेंदूतील आनंददायक रसायने वाढतात, योग व ध्यानमुळे मन स्थिर राहते, डायरी लिहावी. भावना शब्दांत उतरवणे ही पहिली पायरी. मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशकाच्या सल्ल्याने औषधोपचार घेणे गरजचे असते.


मानसिक नव्हे, शारीरिक आरोग्यावरही परिणाम

  • स्माइल डिप्रेशन शरीरावरही परिणाम करतो. डोकेदुखी, मणक्याचा त्रास, पचन तंत्रातील बिघाड, रक्तदाब वाढणे, हृदयविकाराचा धोका, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, हार्मोनल असंतुलन आदी आरोग्यावर परिणाम होतो.
  • विचार, मनोअवस्था व्यक्त करताना बिचकतात सततचा सामाजिक दबाव सर्व काही ठीक आहे, हे दाखवण्याचे अपयश, नात्यातील तणाव किंवा बालपणीचे दुःख, आत्मसन्मान कमी होणे, अशा मनोवस्थेत असलेले व्यक्तीचे विचार बिचकतात.


हा आजार नाही, तर शरीरात केमिकल लोचा !
स्माइल डिप्रेशन ही केवळ मानसिक दुर्बलता नसून, मेंदूतील रासायनिक बदलांशी संबंधित स्थिती आहे. विशेषतः सेरोटोनिन, डोपामिन आणि नॉरएपिनेफ्रिन यांचा असंतुलित साव, यासाठी जबाबदार ठरतो. त्यामुळे यात शरीर आणि मन दोन्हीवर परिणाम होतो. ही एक सजीव सायकॉलॉजिकल स्टेट आहे.


'स्माइल डिप्रेशन'ची ही ठळक लक्षणे
चेहऱ्यावर हास्य पण डोळ्यांत रिकामेपणा, एकांतात रडू येणे किंवा भावनांचा उद्रेक, झोप न लागणे, जास्त झोप येणे, भूक कमी होणे किंवा अनियमित होणे, सतत थकवा जाणवणे, स्वतःबद्दल नकारात्मक विचार, घबराट, उत्साही वाटत असूनही आतून काहीही वाटत नसणे आदी लक्षणे आहेत. ही लक्षणे आढळताच संबंधित रुग्णांनी मानसिक रोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.


"स्माइल डिप्रेशन ही एक अदृश्य मानसिक समस्या आहे. समाजाने हसत खेळणाऱ्या चेहऱ्यांपलीकडे पाहायला शिकले पाहिजे, कारण अनेकदा सर्वात मोठे दुःख मूक, हसते आणि एकटे असते. त्यामुळे आपण सर्वांनी एकमेकांच्या भावनिक आरोग्याकडे जागरूकपणे पाहायला हवे."
- डॉ. सचिन हेमके, मानसिक रोग तज्ज्ञ, गडचिरोली.

Web Title: Smile on your face, ache in your heart; What is the cause of smile depression?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.