(Image Credit : Medical News Today)
अलिकडे झोपेबाबत वेगवेगळे रिसर्च सतत होत असतात. झोप ही आपल्या चांगल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाची आहे हे यातून सांगितलं जातं. अलिकडच्या बदलत्या लाइफस्टाईलमुळे लोकांचा झोपेचा कालावधीही कमी झालाय आणि झोपेच्या वेळाही बदलल्या आहेत. पण याकडे अनेकजण फार गंभीरतेने बघत नाहीत, आणि त्यांना वेगवेगळ्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, कमी झोप घेणे किंवा पुरेशी झोप घेणे याचा संबंध थेट ब्लड प्रेशरशी आहे. याआधी झोप आणि ब्लड प्रेशरसंबंधी अशाप्रकारची बाब समोर आली नव्हती.
सायकोसोमॅटिक मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या नव्या रिसर्चमध्ये कमी झोप घेणे किंवा झोपेची गुणवत्ता खराब असल्याने होणाऱ्या समस्यांची शक्यता सांगण्यात आल्या आहेत. या स्ट्रोक, हार्ट अटॅक आणि हार्ट संबंधी समस्या वाढून मृत्युचा धोका वाढण्यासंबंधी शक्यतांची माहिती देण्यात आली आहे.
या रिसर्चचे मुख्य लेखक कॅरोलीन डॉयल यांनी सांगितले की, असे अनेक आजार आहेत ज्यांचां थेट संबंध झोपेशी असतो. यासाठी आम्ही झोप ब्लड प्रेशरला कशी कंट्रोल करते हे जाणून घेण्यासाठी हा रिसर्च केला. त्यांनी सांगितले की, या रिसर्चसाठी त्यांच्या टीमने ३०० लोकांच्या समूहाला एकत्र आणलं होतं.
डॉयल यांनी सांगितले की, या समूहात २१ ते ७० वयोगटातील पुरूष आणि महिलांचा समावेश होता. यांना या रिसर्चमध्ये सहभागी करून घेताना या गोष्टी काळजी घेण्यात आली की, यातील कुणालाही हार्ट संबंधी काही समस्या असू नये. त्यानंतर सर्वांनाच दोन दिवस पोर्टेबल ब्लड प्रेशर कफ देण्यात आला. या कफच्या माध्यमातून दररोज ४५ मिनिटाच्या अंतराने ब्लड प्रेशरचं रीडिंग घेतलं गेलं.
त्यांनी पुढे सांगितले की, या सहभागी लोकांनी रात्रभर रिस्ट वॉचप्रमाणे एक्टिग्राफी(झोपेची गुणवत्ता मोजणारं यंत्र) घातलं होतं. याने त्यांच्या झोपेची गुणवत्ता मोजली गेली. सोबतच याचीही माहिती मिळाली की, जे लोक चांगली झोप घेऊ शकत नाहीयेत त्यांचं ब्लड प्रेशर वाढलं होतं. म्हणजे या रिसर्चने ही बाब तर स्पष्ट झालं की, जे लोक पुरेशी झोप घेऊ शकले नाहीत किंवा चांगली झोप घेऊ शकत नाहीत त्यांचं ब्लड प्रेशर वाढलं होतं. या रिसर्चच्या माध्यमातून हेही सांगण्यात आलं की, एका रात्रीची प्रॉपर आणि चांगली झोप कशाप्रकारे ब्लड प्रेशरला नियंत्रित करू शकते.