सावधान! वयाच्या पन्नाशीनंतर 'नागीण' ठरू शकते जीवघेणी; ४८% भारतीय डॉक्टरांचा सल्लाही घेत नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 16:27 IST2026-02-26T16:27:08+5:302026-02-26T16:27:20+5:30
Shingles treatment India : भारतात ५० वर्षांवरील ७५ दशलक्ष लोक जुनाट आजारांसह जगत असून त्यांना नागिणीचा मोठा धोका आहे. लसीकरण आणि वेळेवर उपचार यांबाबत जनजागृती करण्यासाठी वाचा सविस्तर रिपोर्ट.

सावधान! वयाच्या पन्नाशीनंतर 'नागीण' ठरू शकते जीवघेणी; ४८% भारतीय डॉक्टरांचा सल्लाही घेत नाहीत
वाढते वय आणि मधुमेह, हृदयविकार यांसारख्या जुनाट आजारांमुळे ५० वर्षे ओलांडलेल्या भारतीयांमध्ये 'नागीण' या वेदनादायी आजाराचा धोका वाढला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सुमारे ४८% भारतीय प्रौढ या आजाराच्या प्रतिबंधाबाबत आपल्या डॉक्टरांशी चर्चाच करत नाहीत, असे एका नवीन जागतिक सर्वेक्षणातून समोर आले आहे. २३ फेब्रुवारी ते १ मार्च या 'नागीण कृती सप्ताहा'च्या पार्श्वभूमीवर हे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत.
नागीण हा व्हेरिसिला-झोस्टर विषाणूमुळे होणारा एक अत्यंत वेदनादायक त्वचाविकार आहे. ज्यांना लहानपणी कांजिण्या झाल्या आहेत, त्यांच्या शरीरात हा विषाणू सुप्त अवस्थेत असतो आणि वय वाढल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली की तो पुन्हा सक्रिय होतो. यामुळे छातीवर, पोटावर किंवा चेहऱ्यावर वेदनादायक फोड आणि पुरळ येतात.
सर्वेक्षणातील प्रमुख निष्कर्ष
नागीण झालेल्या ४३% भारतीयांनी रोजच्या कामात व्यत्यय आणणाऱ्या तीव्र वेदना नोंदवल्या आहेत. किडनी विकार आणि हृदयविकार असलेल्या रुग्णांना या आजाराचा सर्वाधिक त्रास होतो, तर मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. चारपैकी एका व्यक्तीला नागिणीच्या धोक्याबद्दल पुरेशी माहिती नाही. अनेकांना वाटते की केवळ जुनाट आजारांचे व्यवस्थापन केल्याने संसर्ग टाळता येतो, जे चुकीचे आहे.
लसीकरण हाच उपाय
नागीण केवळ लसीकरणाद्वारे टाळता येऊ शकते, मात्र त्याबद्दल डॉक्टरांशी संवाद होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. भारतातील ६० वर्षांवरील लोकसंख्या २०५० पर्यंत ३४७ दशलक्षांवर जाण्याची शक्यता आहे. वाढते वय आणि असंसर्गजन्य आजार यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येणार आहे.