हवेतच धोकादायक व्हायरसला ओळखणार सेन्सर; कोरोनासारख्या आजारांबाबत झटपट मिळेल अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 14:36 IST2024-12-18T14:35:23+5:302024-12-18T14:36:34+5:30
हवेत असलेले धोकादायक व्हायरस शोधण्यासाठी लगेचच अलर्ट करणाऱ्या उपकरणांची नितांत गरज आहे. शास्त्रज्ञांना या दिशेने आता मोठं यश मिळालं आहे.

फोटो - zeenews
कोरोना महामारीच्या काळात हे स्पष्ट झालं की, हवेत असलेले धोकादायक व्हायरस शोधण्यासाठी लगेचच अलर्ट करणाऱ्या उपकरणांची नितांत गरज आहे. शास्त्रज्ञांना या दिशेने आता मोठं यश मिळालं आहे. रशिया आणि अमेरिकेसारख्या देशांनी असे अत्याधुनिक सेन्सर विकसित केले आहेत, जे हवेतील व्हायरसची उपस्थिती त्वरित ओळखण्यास सक्षम आहेत. या तंत्रज्ञानाच्या विकासात भारतही मागे नाही. आयआयटी चेन्नईसारख्या संस्थाही या दिशेने वेगाने काम करत आहेत.
अमेरिकेच्या मियामी विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. प्रतिम विश्वास यांनी नुकतीच दून विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय एयरोसोल परिषदेत या तंत्रज्ञानाविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, हे सेन्सर हवेतील धोकादायक कण आणि व्हायरस अचूकपणे ओळखू शकतात. सेन्सर केवळ व्हायरस शोधणार नाहीत, तर व्हायरस किती धोकादायक आहे हे देखील सांगतील. या तंत्रज्ञानाचा वापर व्हायरसला त्याच्या उगमस्थानी नष्ट करण्यासाठी देखील केला जाईल.
अमेरिका आणि रशियासारख्या देशांमध्ये हे सेन्सर कोरोनाच्या काळात विकसित करण्यात आले होते. आता त्यांना आणखी अपग्रेड करण्याचे काम सुरू आहे, जेणेकरून भविष्यात कोणत्याही व्हायरसचा प्रसार रोखता येईल. दून विद्यापीठाचे प्रोफेसर डॉ विजय श्रीधर म्हणाले की, भारतातील काही मोठ्या संस्था देखील हे तंत्रज्ञान विकसित करण्यात गुंतल्या आहेत. येत्या काळात देशातील प्रमुख शहरं आणि रुग्णालयांमध्ये या सेन्सर्सचा वापर केला जाणार आहे. या सेन्सर्समुळे व्हायरसचा त्वरित शोध घेण्यात आणि संसर्गाचा प्रसार रोखण्यात मदत होईल.
आजार रोखण्यास मदत
शास्त्रज्ञांचा दावा आहे की, या सेन्सर्सच्या माध्यमातून कोरोना व्हायरससारख्या घातक आजारांना रोखण्यासाठी मोठी मदत होणार आहे. हवेतील व्हायरस ओळखून वेळीच योग्य ती पावलं उचलली जाऊ शकतात. विशेष बाब म्हणजे हे सेन्सर नवीन व्हायरस ओळखण्यात आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठीही उपयुक्त ठरतील.
प्रदूषण रोखण्यात मोठी भूमिका
प्रोफेसर श्रीधर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्बन कॅप्चर तंत्रज्ञानही जगभरात वेगाने विकसित होत आहे. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी हे तंत्रज्ञान मोठी क्रांती ठरू शकते. भारतातील NTPC सारख्या संस्था हे तंत्रज्ञान वापरत आहेत.