आपल्या मुलांना एनर्जी ड्रिंक्स देत असाल तर वेळीच सावध व्हा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 17:01 IST2018-10-02T17:01:26+5:302018-10-02T17:01:59+5:30
लहान मुलं आणि तरूणांनी कॅफेन असलेलं एनर्जी ड्रिंक घेणं फार घातक ठरू शकत. कारण यामुळे त्यांना लठ्ठपणासोबतच मानसिक समस्यांना बळी पडण्याची शक्यता असते.

आपल्या मुलांना एनर्जी ड्रिंक्स देत असाल तर वेळीच सावध व्हा!
लहान मुलं आणि तरूणांनी कॅफेन असलेलं एनर्जी ड्रिंक घेणं फार घातक ठरू शकत. कारण यामुळे त्यांना लठ्ठपणासोबतच मानसिक समस्यांना बळी पडण्याची शक्यता असते. तज्ज्ञांच्या मते, कॅफेन संपूर्ण जगभरामध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा सायकोअॅक्टिव ड्रग आहे. कारण त्यामुळे शारीरिक प्रक्रिया नव्या ऊर्जेसह पुन्हा सुरु होण्यास मदत होते.
ब्रिटनमधील रॉयल कॉलेज ऑफ पेडियाट्रिक्स अॅन्ड चाइल्ड हेल्थ (आरसीपीसीएच)चे अभ्यासक रसेल वाइनर यांनी सांगितले की, 'कॅफेन मेंदूला चालना देतं आणि झोपेमध्ये अडथळा आणतं. हे लहान मुलांमध्ये व्यवहार संदर्भातील समस्यांशी जोडलेलं आहे.' काही दिवसांपूर्वी झालेल्या संशोधनातून अशी माहिती समोर आली आहे की, कॅफेनचा लहान मुलांच्या मेंदूवर विपरित परिणाम होतो.
वाइनर यांनी सांगितले की, 'ही फार चिंताजनक बाब आहे, कारण त्यामुळे मनोविकार होण्याची शक्यता असते. त्यांनी द बीएमजे जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनात असे सांगितले आहे की, 'लहान मुलं आणि तरूणांना कॅफेनयुक्त एनर्जी ड्रिंक्सपासून दूर ठेवणं गरजेचं आहे. जेणेकरून त्यांचा लठ्ठपणा आणि मानसिक विकारांपासून बचाव होऊ शकतो.