प्रदूषणाचा फुप्फुसाबरोबर किडनीवरही परिणाम; लहान मुलांना होतो सर्वाधिक त्रास
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 13:32 IST2018-09-17T13:28:14+5:302018-09-17T13:32:43+5:30
ड्युक विद्यापिठामध्ये झालेल्या संशोधनानुसार प्रदुषणाचा किडनीवर परिणाम होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रदूषणाचा फुप्फुसाबरोबर किडनीवरही परिणाम; लहान मुलांना होतो सर्वाधिक त्रास
वॉशिंग्टन- प्रदूषणाचा आपल्या फुप्फुसांवर परिणाम होतो हे आपल्याला माहिती आहेच मात्र विविध प्रदूषकांचा मूत्रपिंडाच्या (किडनीच्या) आरोग्यावरही दुष्परिणाम होत असल्याचे एका संशोधनामधून स्पष्ट झाले आहे. उद्योगांच्या प्रोसेसर्समध्ये तसेच अनेक उत्पादनांमध्ये पर अँड पॉलीफ्लुरोलकिल सबस्टन्सेस म्हणजेच पीएफएस ही विघटन न होणारी प्रदुषके असतात. ही प्रदूषके आपल्या वातावरणामध्ये सर्वत्र मिसळलेली असल्याचे ड्युक विद्यापिठातील संशोधकांनी स्पष्ट केले आहे.
फुफ्फुसांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी फायदेशीर ठरतात 'हे' 6 पदार्थ!
पीएफएस ही प्रदुषके आपल्या मातीमध्ये, अन्नामध्ये, पाण्यात, हवेत सर्वत्र आहेत. माणसांचा त्याच्याशी सतत थेट संबंध येतो. अशी माहिती क्लिनिकल जर्नल ऑफ द अमेरिकन सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजी (सीजेएएसएन)मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या शोधनिबंधात नमूद करण्यात आली आहे. या पीएफएएस प्रदूषकांचा माणासाच्या मूत्रपिंडांवर परिणाम होतो का हे तपासण्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या वैद्यकीय साहित्याचा उपयोग संशोधकांनी केला. मूत्रपिंडे ही अत्यंत संवेदनशील असतात. जेव्हा हवेतील प्रदुषके आपल्या रक्तप्रवाहामध्ये येतात तेव्हा मूत्रपिंडांना धोका अधिक संभवतो असे ड्युक विद्यापिठाच्या जॉन स्टॅनिफर यांनी सांगितले.
याबाबत 74 रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर त्यांना पीएफएसच्या संपर्कात आल्यामुळे विविध त्रासांना सामोरे जावे लागले आणि किडनीजवळील नलिका व चयापचयातील मार्गांमध्ये अडथळे निर्माण झाल्याने मूत्रपिंडाचे आजार निर्माण झाले. प्रौढांपैक्षा लहान मुले या प्रदुषकांच्या संपर्कात जास्त येतात अशी भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे. आजपर्यंत प्रसिद्ध झालेले सर्व शोधनिबंध व वैद्यकीय साहित्य वाचल्यानंतर या रासायनिक प्रदुषकांचा मूत्रपिंडावर विविध मार्गांनी परिणाम होत असल्याचे आम्ही अनुमान काढले असे स्टॅनिफर यांनी स्पष्ट केले. ही रसायने मूत्रपिंडाच्या आजारांशी संबंधित असल्याचे अनेक अहवाल आम्हाला आढळून आले आहेत असेही ते म्हणाले.
किडनीसंबंधी आजारांनी ग्रस्त असलेल्यांना फायदेशीर ठरते कॉफी - रिसर्च