टेस्ट कोणाकडून अन् सही कोण करतो ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 12:25 IST2026-01-18T12:25:12+5:302026-01-18T12:25:43+5:30
सध्याच्या घडीला आजाराचे निदान करावयाचे असल्यास वैद्यकीय तज्ज्ञ काही रक्ताच्या चाचण्या करून घेण्यास सांगतात. या चाचण्या इतक्या महत्त्वपूर्ण असतात की, त्या चाचण्यांच्या निदानाच्या आधारावरच डॉक्टर आजाराचे निदान करून उपचाराची दिशा ठरवत असतात. या चाचण्यांचे अहवालच डॉक्टरांच्या उपचाराची दिशा ठरवत असतात. जर या अहवालात काही गडबड झाली तर उपचारांची दिशा चुकू शकते.

टेस्ट कोणाकडून अन् सही कोण करतो ?
डॉ. अविनाश फडके
वरिष्ठ पॅथॉलॉजिस्ट
आजारांचे निदान करण्यामध्ये पॅथॉलॉजी आ चाचण्यांच्या सिंहाचा वाटा आहे. जवळजवळ ७० ते ७५ टक्के वैद्यकीय निदान हे लॅब्सच्या रिपोर्टवर अवलंबून असते. साधे उदाहरणच द्यायचे म्हटले तर, ताप आल्यावर तो डेंग्यू आहे की, मलेरिया आहे की, चिकनगुनिया आहे हे लॅबचा रिपोर्टच ठरवतो. कारण या आजारांमध्ये लक्षणे सर्वसाधारणपणे सारखीच असतात. रुग्णाला मेनिंजाइटिससारखा गंभीर आजार झाला तर तो कुठल्या जिवाणूमुळे आहे हे पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचा रिपोर्टच ठरवतो व त्याप्रमाणे उपचार केला जातो. आपल्याला किडनी, लिव्हर, हृदयविकार, थायरॉइड व कॅन्सरचे निदानही या चाचण्यांवरच अवलंबून असते; परंतु जी काळजी आपण सर्वजण डॉक्टर किंवा हॉस्पिटल निवडताना घेतो, ती काळजी आपण योग्य लॅब निवडताना घेतो का? हा प्रश्न पडतो.
जर आपण आपल्या पॅथॉलॉजीच्या चाचण्या अनियंत्रित, गुणवत्तेचे प्रमाणपत्र नसलेल्या किंवा ज्या लॅबमध्ये पॅथॉलॉजिस्टच नाहीत, अशा लॅबमध्ये केल्या तर चुकीचे रिपोर्ट आल्यामुळे चुकीचे निदान होऊन रुग्णांच्या स्वास्थ्याला गंभीर धोका निर्माण होतो. चुकीची ट्रीटमेंट मिळाल्यामुळे कधीकधी पेशंटला नंतर अॅडमिट करावे लागते आणि मोठ्या प्रमाणाच खर्च होतो. योग्य लॅब निवडली गेली असती तर तो खर्च सहजपणे टाळता येतो.
१२ डिसेंबर २०१७ मध्ये सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे, फक्त एमडी व डीएनबीसारखे पदवीधारक अथवा डीसीपी वा डीपीबीसारखे डिप्लोमा होल्डर हेच डॉक्टर पॅथॉलॉजी रिपोर्टवर सह्या करू शकतात. इतकेच नाही, तर सर्व चाचण्या त्यांच्या योग्य देखरेखीखाली झाल्यावरच ते सह्या करू शकतात. डीएमएलटी किंवा अन्य टेक्निशियन लॅब चालवत असेल तर, त्याला या पदवीधारकांची किंवा डिप्लोमा होल्डरची संपूर्ण देखरेख असणे आणि नंतरच त्यांची सही घेऊन पेशंटला रिपोर्ट देणे हे अत्यंत आवश्यक आहे.
नियमावलीविषयी चर्चा, पण अंमल नाही
तज्ज्ञ डॉक्टरांची देखरेख आणि त्यांच्या सहीबाबतचे नियम न पाळता हजारो लॅब अयोग्य रिपोर्ट्स पेशंटला देत असतात. या प्रयोगशाळांवर (लॅब्स) सध्याच्या घडीला शासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येते. यावर तोडगा म्हणून अनेकदा महाराष्ट्र विधानसभेत पॅथॉलॉजी लॅबच्या नियमावलीविषयी चर्चा झाली आहे.
मंत्री आशिष शेलार यांनी बोगस पॅथॉलॉजी लॅबचा मुद्दा अनेकदा विधानसभेत मांडला आहे. तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीसुद्धा नियमावली तयार केली होती; मात्र नंतर दुर्दैवाने त्याची अंमलबजावणी झाली नाही. आता लवकरच या लॅब्सवर नियंत्रण आणण्यासाठी स्वतंत्र नियम आणि नियमावली तयार करणार असल्याची बातमी आहे.
उपाय काय करावा? कशी निवडावी लॅब ?
सध्या कोणीही टेक्निशियन फक्त शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट व पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे सर्टिफिकेट घेऊन सहजपणे लॅब सुरू करू शकतो. काही एमडी पॅथॉलॉजिस्टसुद्धा अनेक छोट्या लॅब्समध्ये स्वतःच्या देखरेखीशिवाय केलेल्या चाचण्यांच्या रिपोर्टवर आपल्या सह्या द्यायची परवानगी देतात. त्यामुळे अशा काही पॅथॉलॉजिस्टवर खटले करून काहींचे रजिस्ट्रेशनसुद्धा रद्द झाले आहे.
हा मुद्दा अत्यंत गंभीर असल्यामुळे त्याच्यावर तत्काळ उपाययोजना आवश्यक आहे. त्यासाठी पॅथॉलॉजिस्ट, आरोग्य विभाग व स्वतंत्र सल्लागार नियुक्त करून एक समिती नेमण्याची गरज आहे. या समस्येवर लगेच सोपी उपाययोजना करणे अवघड आहे. टप्प्याटप्प्यानेच ती अमलात आणावी लागेल.
रुग्णांनासुद्धा जागरूक राहण्याची अत्यंत आवश्यकता आहे. सर्व लॅब्सचे रिपोर्ट सारख्या गुणवत्तेचे नसतात. त्यामुळे ज्या लॅबला एनएबीएल प्रमाणपत्र आहे किंवा जी लॅब एमडी पॅथॉलॉजी पदवी असलेले डॉक्टर चालवतात, अशाच गुणवत्ता असलेल्या लॅबचा वापर करणे अधिक योग्य ठरेल. अन्यथा चुकीच्या रिपोर्टमुळे रुग्णाच्या आरोग्याला धोका उत्पन्न होऊ शकतो.