पुरूषांचं वाढलेलं वजन त्यांच्या होणाऱ्या बाळासाठी घातक, होऊ शकतं डीएनएचं नुकसान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 14:55 IST2025-01-08T14:53:50+5:302025-01-08T14:55:02+5:30
Health Research : नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, ज्या पुरूषांचं वजन जास्त असतं, त्यांच्या होणाऱ्या मुलांचं वजन कमी असू शकतं.

पुरूषांचं वाढलेलं वजन त्यांच्या होणाऱ्या बाळासाठी घातक, होऊ शकतं डीएनएचं नुकसान!
Health Research : वजन वाढलेल्या लोकांना वेगवेगळ्या शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जसे की, हृदयरोग, हार्ट अटॅक, स्ट्रोक, हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्टेरॉल, फॅटी लिव्हर, डायबिटीस, संधिवात, श्वास घेण्यास अडचण, गॅस, डिप्रेशन एंझायटी इत्यादी. मात्र, नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, ज्या पुरूषांचं वजन जास्त असतं, त्यांच्या होणाऱ्या मुलांचं वजन कमी असू शकतं.
साओ पाओलो यूनिव्हर्सिटीच्या रिबेरियो प्रेटो मेडिकल स्कूलच्या अभ्यासकांना नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून आढळून आलं की, लठ्ठपणामुळे पुरूषांच्या स्पर्मचं स्ट्रक्चर आणि क्वालिटी व डीएनए प्रभावित होऊ शकतो. ८९ आई-वडील आणि त्यांच्या नवजात बाळांच्या वजनाचा अभ्यास करण्यात आल्यावर असं समोर आलं की, पुरूषांच्या कंबरेचा आकार आणि बीएमआय जेवढा जास्त असेल, तेवढं त्यांच्या मुलांचं वजन कमी असेल.
रिसर्चर डॉ. मारियाना रिनाल्डी कार्वाल्हो म्हणाल्या की, 'भ्रूणाचा विकास आणि आईच्या आरोग्याचा संबंध यावर अनेक रिसर्च करण्यात आले. पण आमच्या रिसर्चमधून हे समोर आलं की, भ्रूण आणि वडिलांचं आरोग्य प्रेग्नेन्सी दरम्यान आणि डिलिव्हरीनंतर बाळाच्या ग्रोथमध्ये महत्वाचं योगदान देते'.
'आमचा रिसर्च ब्राझीलच्या फॅमिली संबंधित पहिला रिसर्च होता, ज्यात दाखवण्यात आलं की, वडिलांचा बीएमआय जेवढा जास्त असेल, बाळाचं वजन जन्मावेळी तेवढं जास्त कमी असेल. यातून बाळाचं आरोग्य आणि विकासात वडिलांचं महत्व दिसून येतं. कमी वजनासोबत जन्माला आलेल्या बाळांना पुढे जाऊन टाइप २ डायबिटीस, कॅन्सर आणि हृदयरोगांचा धोका अधिक असतो'.
या रिसर्चमधून असंही समोर आलं आहे की, खराब डाएट, सुस्त लाइफस्टाईल किंवा धुम्रपानामुळे वडिलांकडून बाळात जाणाऱ्या जीन्समध्ये परिवर्तन होऊ शकतं. जास्त वजन असलेल्या वडिलांकडून जन्माला आलेल्या बाळांना गर्भातच विकासासंबंधी समस्यांचा सामना करावा लागतो. ज्यामुळे त्यांची योग्य वाढ होत नाही आणि त्यांचं वजनही कमी राहतं.
डॉ. कार्वाल्हो म्हणाल्या की, 'आम्ही हे माहीत आहे की, अधिक वजन वडिलांच्या शुक्राणूंच्या स्ट्रक्चरला आणि क्वालिटीला प्रभावित करतं. ज्यामुळे बाळाचा डीएनए सुद्धा प्रभावित होऊ शकतो. आमच्या निष्कर्षातून समोर आलं की, ज्याप्रकारे गर्भवती असताना आईला सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते, त्याचप्रमाणे वडिलांच्या लाइफस्टाईलमध्येही बदल गरजेचा आहे'.