बाधितांइतकेच कोरोनामुक्त रहात असल्याने उपचारार्थी संख्या कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 17:59 IST2021-07-03T17:58:04+5:302021-07-03T17:59:26+5:30
नाशिक : जिल्ह्यात जून महिन्याच्या प्रारंभापासून रुग्णसंख्येचे प्रमाण वेगाने घटू लागले होते. मात्र, २१ जूनला सर्वप्रथम उपचारार्थी रुग्णसंख्या अडीच हजारांखाली गेल्यानंतर जवळपास पंधरवडा उलटूनही उपचारार्थी रुग्णसंख्या अडीच हजारांच्याच आकड्याच्या आसपास कायम आहे.

बाधितांइतकेच कोरोनामुक्त रहात असल्याने उपचारार्थी संख्या कायम
नाशिक : जिल्ह्यात जून महिन्याच्या प्रारंभापासून रुग्णसंख्येचे प्रमाण वेगाने घटू लागले होते. मात्र, २१ जूनला सर्वप्रथम उपचारार्थी रुग्णसंख्या अडीच हजारांखाली गेल्यानंतर जवळपास पंधरवडा उलटूनही उपचारार्थी रुग्णसंख्या अडीच हजारांच्याच आकड्याच्या आसपास कायम आहे.
नाशिक जिल्ह्यात एकूण उपचारार्थी रुग्णसंख्या एप्रिल महिन्याच्या अखेरीस ४८ हजारांवर गेली होती. त्यात मे महिन्यात सर्वाधिक मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यामुळेच १ जूनला उपचारार्थी रुग्णसंख्या ८४८२ झाली होती. त्यानंतरही कोरोना उपचारार्थी रुग्णसंख्या वेगाने घटणे सुरुच होते. तीन आठवड्यांनी म्हणजेच २१ जूनला ही रुग्णसंख्या घटून प्रथमच अडीच हजारांखाली जाऊन २४१० रुग्णांवर आली. मात्र, त्यानंतरच्या गत १५ दिवसात साधारणपणे जेवढे नवीन रुग्ण बाधित आढळून येत होते, साधारण तेवढेच रुग्ण कोरोनामुक्त होत असल्याने उपचारार्थी रुग्णसंख्या २४०० ते २५०० या दरम्यानच रहात आहे. कोरोना बाधित संख्येत मोठी घट आणि कोरोनामुक्त होण्याचे दररोजचे प्रमाण त्या तुलनेत ज्यावेळी अधिक राहिल, त्याचवेळी ही उपचारार्थी रुग्णसंख्या अडीच हजारांपासून दोन हजारांखाली जाऊ शकणार आहे. पहिल्या लाटेनंतर दुसरी लाट सुरु होण्यापूर्वी जानेवारीअखेरीस तर उपचारार्थी रुग्णसंख्या केवळ एक हजारावर आली होती. मात्र, त्यानंतरच हळूहळू बाधित संख्या वाढत जाऊन तर कोरोनामुक्त संख्या कमी होत जाऊन दुसऱ्या लाटेचा कहर निर्माण झाला होता.