...आता झोपण्यासाठी सुट्टी घेण्याची वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 05:21 AM2021-10-21T05:21:20+5:302021-10-21T05:22:24+5:30

जगभरातील सर्वच लोकांची झोप दिवसेंदिवस कमी होत आहे. याचा फार मोठा फटका जगाला बसतो आहे. यापुढील काळात ही समस्या आणखीन वाढत जाणार, असा शास्त्रज्ञांचा कयास आहे.

Now its time to take holiday to sleep | ...आता झोपण्यासाठी सुट्टी घेण्याची वेळ!

...आता झोपण्यासाठी सुट्टी घेण्याची वेळ!

Next

उत्तम आरोग्य आणि चांगल्या आयुष्यासाठी प्रत्येकाला पुरेशी झोप आवश्यक आहे, हे आजपर्यंतच्या प्रत्येक संशोधनातून सिद्ध झालं आहे. अपुऱ्या झोपेमुळे आपल्या आरोग्यावर काय दुष्परिणाम होतात, हेही प्रत्येकाला माहीत आहे, तरीही जगभरातील सर्वच लोकांची झोप दिवसेंदिवस कमी होत आहे. याचा फार मोठा फटका जगाला बसतो आहे. यापुढील काळात ही समस्या आणखीन वाढत जाणार, असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. याचं कारण आहे, लोकांनी स्वत:हूनच आपली झोप कमी केली आहे. 

प्रत्येकालाच एकावेळी अनेक दगडांवर पाय ठेवणं गरजेचं झालं आहे. एक काम झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, एक जबाबदारी पूर्ण होत नाही, तोच इतर अनेक जबाबदाऱ्या अंगावर येऊन पडणं, त्यासाठी धावत-पळत राहणं, हे आज प्रत्येकासाठीच अपरिहार्य झालं आहे. ‘वेळ नाही’ ही आता सबब राहिलेली नाही, तर ती एक जीवघेणी वस्तुस्थिती बनली आहे. पण वेळच जर नाही, तर तो आणायचा कुठून? अशावेळी सगळ्यात पहिल्यांदा गंडांतर येतं ते झोपेवर. सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याच्या नादात लोकांची झोप कमी-कमी होत चालली आहे. आणखी एक धक्कादायक गोष्ट संशोधकांच्या लक्षात आली आहे, ती म्हणजे या सगळ्या जबाबदाऱ्यांच्या जंजाळात, अनेकांकडे स्वत:ची स्पेस, स्वत:साठी, मनोरंजनासाठी, विरंगुळ्यासाठी वेळच राहिलेला नाही. दिवसभर मी इतकी मरमर करतोय, तर विरंगुळा, थोडं मनोरंजन हा माझा हक्कच आहे, अशी मानसिकताही वाढीस लागली आहे. स्वत:साठी वेळ मिळावा, यासाठीही अनेकांनी जाणूनबुजून झोपेला कात्री लावली आहे. म्हणजे कामाच्या रामरगाड्यात आधीच झोप कमी झालेली, त्यात स्वत:साठी वेळ काढायचा म्हणून झोपेला पुन्हा हाकलून लावायचं, असं एक विचित्र चक्र जगभरात सुरू झालं आहे. 

कोरोनाकाळात यासंदर्भात जगभरातील विविध देशांतील लोकांचा अभ्यास करणारं एक सर्वेक्षण करण्यात आलं. अनेक देशांतील तब्बल १३ हजार जणांची दीनचर्या या काळात तपासण्यात आली. यातून हाती आलेला निष्कर्ष अतिशय धक्कादायक आहे. लोकांची, त्यातही तरुणांची झोप दिवसेंदिवस अतिशय कमी होते आहे. कमी झोपेचे दुष्परिणाम माहीत असूनही, झोपेला त्यांनी स्वत:हूनच कात्री लावली आहे. दिवसभर १२ ते १४ तास काम केल्यानंतर रात्री टाईमपास करणं, टीव्ही पाहणं, मोबाईलवर गेम खेळणं, क्लब्ज, लेट नाईट पार्ट्यांना जाणं. हा प्रकार वाढीस लागला आहे. हा एक आजार असल्याचंही निष्पन्न झालं आहे. या आजाराचं नाव आहे ‘स्लीप प्रोक्रास्टिनेशन’ म्हणजे ‘झोपेची चालढकल’ किंवा ‘झोपेची दिरंगाई’. संशोधकांनी ज्या लोकांचा अभ्यास केला, त्यात ७० टक्के तरुण या विकाराला बळी पडलेले दिसून आले. अर्थात स्वत:च झोपेची चालढकल केल्यामुळे होणारा हा विकार जगात पहिल्यांदा लक्षात आला तोच मुळी अवघ्या काही वर्षांपूर्वी म्हणजे २०१४मध्ये. त्यामुळे त्यावरचं संशोधनही अजून प्राथमिक टप्प्यावरच आहे. 

यासंदर्भात निद्राविकारतज्ज्ञ डॉ. लिंडसे ब्राऊनिंग म्हणतात, ‘स्लीप प्रोक्रास्टिनेशन’चा विकार दिवसेंदिवस वाढतोच आहे. झोपेला टांग मारुन ‘फ्री टाईम’ मिळविण्याच्या नादात लोक आपलं आयुष्य धोक्यात घालताहेत . ब्रिटन, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, चीन आणि युरोपात तरुण मोठ्या संख्येनं या विकारानं ग्रस्त आहेत. युरोपात तर तरुणांबरोबर त्यांचे पालकही या विकाराला बळी पडताहेत.  

दोन वर्षांपूर्वी झालेल्या एका जागतिक अभ्यासाचा निष्कर्ष आहे, जगातील ५१ टक्क्यांपेक्षा जास्त लोक गरजेपेक्षा कमी झोपतात. त्यामुळे विविध समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतं. इंग्लंडमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. तिथे तब्बल ६३ टक्के लोक कमी झोपतात. त्याखालोखाल इतर देशांची झोपेची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. सिंगापूर (६२ टक्के), ऑस्ट्रेलिया (६१ टक्के), अमेरिका (५८ टक्के), चीन आणि कोरिया (५३ टक्के), तैवान आणि जपान (४९ टक्के), हाँगकाँग (४८ टक्के), मलेशिया (४७ टक्के), व्हिएतनाम (३८ टक्के), इंडोनेशिया (३४ टक्के).

खास झोपण्यासाठी सुट्टी किंवा रजा!
रोजच्या कामाच्या रगाड्यात अनेकांना झोपायलाच  वेळ मिळत नाही. त्यामुळे आपला झोपेचा कोटा विविध देशांतील लोक वीकेंडला पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्याचं प्रमाण पुढीलप्रमाणे आहे. सिंगापूर आणि मलेशिया (६२ टक्के), ऑस्ट्रेलिया (७३ टक्के), अमेरिका (७२ टक्के), चीन (९० टक्के), तैवान  (८४ टक्के), हाँगकाँग (८७ टक्के), व्हिएतनाम (९२ टक्के), इंडोनेशिया (८५ टक्के), ब्रिटन आणि जपान (६६ टक्के). अनेक देशांतले लोक खास झोपण्यासाठी म्हणून सुट्टी काढतात, रजा घेतात. त्यात व्हिएतनामचे लोक वर्षाला सरासरी ११ दिवस, मलेशिया, तैवान आणि इंडोनेशियाचे लोक वर्षाला नऊ दिवस, चीनचे लोक वर्षाला आठ दिवस, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियाचे लोक वर्षाला सहा दिवस तर ब्रिटन आणि अमेरिकेचे लोक वर्षाला सरासरी पाच दिवस कामावरून सुट्टी घेतात.

Web Title: Now its time to take holiday to sleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.