सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 08:48 IST2025-07-21T08:48:27+5:302025-07-21T08:48:49+5:30

डॉ. रोहित हेगडे श्वसनविकार तज्ज्ञ, सर जे जे रुग्णालय मुंबई हे देशातील सर्वांत गजबजलेले आणि दाट लोकवस्तीचे शहर आहे. ...

Microscopic Particles Attack Lungs: Mumbai's Air Pollution and its Serious Health Impact | सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम

सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम

डॉ. रोहित हेगडे
श्वसनविकार तज्ज्ञ, सर जे जे रुग्णालय

मुंबई हे देशातील सर्वांत गजबजलेले आणि दाट लोकवस्तीचे शहर आहे. वेगाने होणारे  शहरीकरण, औद्योगिकीकरण, वाढती वाहतूक, बांधकामे आदी सर्व घटक शहरातील वायुप्रदूषणात मोठी भर घालतात. याचाच एक गंभीर परिणाम म्हणजे - पीएम २.५ कणांची वाढलेली पातळी, जी आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरते. 

पीएम २.५ म्हणजे काय ? 
पीएम २.५ हे सूक्ष्म श्वसनक्षम कण असतात, जे २.५ मायक्रोमीटर किंवा त्यापेक्षा कमी आकाराचे असतात. मानवी केसाच्या तुलनेत हे कण सुमारे ३० पट लहान असून, हवेत सहज मिसळतात आणि श्वसनमार्गाने फुफ्फुसांत प्रवेश करतात. हे कण मुख्यतः वाहतुकीमधून निर्माण होणाऱ्या धुरातून, औद्योगिक प्रक्रियांमधून, बांधकामच्या धुळीमधून आणि कचऱ्याच्या जळणीतून हवेत मिसळतात.

स्वच्छ हवा हा मूलभूत अधिकार ? 
स्वच्छ हवा ही प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी सरकारने कडक उपाय करणे आवश्यक आहे. यामध्ये हरितवाहनांना प्रोत्साहन, बांधकाम नियमांचे पालन, औद्योगिक नियंत्रण इत्यादींचा समावेश असावा. दुसरीकडे नागरिकांनीही जबाबदारीने वागणे गरजेचे आहे.

आरोग्यावर दुप्परिणाम
प्रदूषित हवेमुळे सीओपीडी (क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मनरी डिसीज), फुफ्फुसांचा कर्करोग, आणि लंग्स फायब्रोसिस यांसारखे गंभीर आजार वाढत आहेत. या आजारांमध्ये रुग्णांचे श्वास घेणे कठीण होते, फुफ्फुसांची कार्यक्षमता घटते आणि शेवटी मृत्यूचा धोका वाढतो. काही वर्षांपासून लहान मुलांमध्ये दमा, सततचा खोकला, ब्राँकायटिस, श्वसनाचा त्रास यासारख्या लक्षणांमध्ये वाढ झाली आहे. तसेच, वयस्कर व्यक्तींमध्ये हृदयरोग आणि स्ट्रोकच्या घटनाही वायुप्रदूषणामुळे वाढल्या आहेत. पीएम २.५  कण रक्तप्रवाहात प्रवेश करून शरीराच्या इतर अवयवांवरही परिणाम करू शकतात.

हवा तपासणी, खबरदारीचे उपाय 
मुंबईत हवा गुणवत्ता निर्देशांक  २०० पेक्षा अधिक नोंदवला जातो, जो ‘मध्यम ते धोकादायक’ श्रेणीत मोडतो. मोबाइल ॲप किंवा वेबसाइटद्वारे हवेच्या गुणवत्तेचे तपशील पाहू शकता.

प्रदूषण वाढले असेल तर...
> शक्यतो घरातच राहावे
> बाहेर पडताना मास्क वापरावा.
> हवामान स्वच्छ करणारे उपकरण (एअर प्युरिफायर) वापरणे उपयुक्त.
> सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करून खासगी वाहनांचे प्रमाण कमी करावे.

Web Title: Microscopic Particles Attack Lungs: Mumbai's Air Pollution and its Serious Health Impact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.