नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 17:36 IST2025-06-17T17:35:02+5:302025-06-17T17:36:52+5:30

गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या समाजात नात्यांमधील विवाहाची परंपरा आहे. परंतु...

Marriage in a relationship; Risk to the health of the baby, pregnancy itself…; Doctor's advice! | नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!

नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!

मुंबई: गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या समाजात नात्यांमधील विवाहाची परंपरा आहे. विशेषतः मामाच्या मुलीशी किंवा इतर जवळच्या नात्यांतील व्यक्तींशी विवाह करण्याची पद्धत काही समाजांमध्ये आजही पाहायला मिळते. मात्र, अशा विवाहांमुळे बाळाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

आरोग्य साक्षरतेच्या वाढत्या जागृतीमुळे नात्यातील विवाहांचे प्रमाण काहीसे घटले असले, तरी अजूनही ते संपूर्णपणे थांबलेले नाहीत. नात्यातील विवाहांमुळे बाळाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तज्ज्ञांनी अनेकवेळा अशा पद्धतीचे विवाह टाळावे. मात्र, जर नात्यात विवाह झाला, तर गर्भधारणेदरम्यान आवश्यक चाचण्या कराव्यात. यात विशेषतः बाळाची रक्तचाचणी केल्यास संभाव्य व्याधींवर उपचार करणे शक्य आहे.

गेल्या काही वर्षांत वैद्यकीय तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे आता गर्भात वाढणाऱ्या बाळामध्ये कोणत्याही गंभीर व्याधी किंवा अनुवांशिक दोष असल्यास ते गर्भधारणेच्या सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखणे शक्य झाले आहे. अशा स्थितीत, जर त्या व्याधीमुळे बाळाचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता असेल, तर वैद्यकीय सल्ल्यानुसार गर्भपात करण्याचा पर्याय निवडता येतो. मात्र, गर्भपात केवळ विशिष्ट आठवड्यांच्या आतच कायदेशीररीत्या करता येतो. सध्या भारतात गर्भपातासाठी वैद्यकीय परवानगी २० ते २४ आठवड्यांपर्यंत आहे. काही गंभीर वैद्यकीय परिस्थितींमध्ये त्यानंतरही गर्भपात करता येतो, पण त्याला न्यायालयाची मंजुरी लागते.

‘थॅलेसिमिया’ एक गंभीर आनुवंशिक आजार
नात्यात विवाह झाल्यास सर्वाधिक आढळणारा आजार म्हणजे थॅलेसिमिया. हा एक आनुवंशिक रक्तविकार असून, यामध्ये शरीरातील हिमोग्लोबिन योग्यप्रकारे कार्य करत नाही. या आजाराने बाधित मुलांना दर ४ ते ६ आठवड्यांनी रक्त चढवावे लागते. त्यामुळे अशा मुलांची विशिष्ट रक्तपेढीत नोंदणी करून नियमित रक्त द्यावे लागते. थॅलेसिमियाव्यतिरिक्तही इतर अनेक अनुवांशिक व्यंग अशा बाळांमध्ये दिसून येऊ शकतात. या मुलांसाठी दीर्घकालीन उपचारांची गरज असून, काही प्रकरणांमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट हाही पर्याय वापरला जातो. हा उपचार खर्चिक असला, तरी बरेच पालक आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी तो मार्ग अवलंबतात. 

डॉक्टर काय म्हणाले?
नात्यातील विवाहानंतर गर्भधारणा झाल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. कारण अशा विवाहांमध्ये बाळाला थॅलेसिमिया, डाऊन सिंड्रोम किंवा इतर अनुवांशिक विकृती होण्याची शक्यता अधिक असते. गर्भधारणेच्या सुरुवातीला केलेली रक्तचाचणी आणि सखोल सोनोग्राफी (ॲनोमली स्कॅन) करून बाळाच्या आरोग्यस्थितीचा अंदाज घेता येतो. डॉक्टरांच्या सल्लानुसार वेळेवर निदान केल्यास गंभीर निर्णय घेणे सोपे जाते तसेच भविष्यातील गुंतागुंत टाळता येते, असे सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर म्हणाले.

Web Title: Marriage in a relationship; Risk to the health of the baby, pregnancy itself…; Doctor's advice!