(image credit- telegraph.uk.com)

हिवाळा सुरू झाला आहे.  थंडिचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. तुम्ही घराबाहेर पाऊल ठेवलेत की, हवेतील गारवा तुमच्या चेहर्‍याला आणि शरीराला जाणवतो. काहींना हा गार वारा अंगावर घ्यायला आवडतो, तर काहींना तपमानातील या फरकाशी जुळवून घेणे कठीण जाते. ज्या व्यक्तींना आधीपासूनच दमा,ब्राँकायटिस, न्यूमोनिया, एम्फीसेमा, सिस्टिक फायब्रॉसिस, प्लूरल एफ्यूजन, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पाल्मनरी डिसीझ यांसारखे श्वसनासंबंधीचे विकार असतील,अशा व्यक्तींसाठी हा थंड वारा धोक्याचा ठरू शकतो. जेव्हा तपमान कमी होते, तेव्हा बर्‍याचदा अगदी ठणठणीत प्रकृतीच्या व्यक्तीलाही श्वास घेणे कठीण होते.

(image credit- telegraph.uk.com)

या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असते. त्यामुळे त्यांना इन्फ्लुएंझा, स्ट्रेप थ्रोट व क्रूप, मॅनेंजायटीस व हायपोथर्मियासारख्या घातक रोगांचा संसर्ग सहज होऊ शकतो. या आजाराविषयी सखोल माहिती नानावटी सुपर स्पेशालिटी मइन-चार्ज एक्सिडेंट व इमर्जन्सी विभागतील वैद्यकीय तज्ञांनी दिली आहे. चला तर मग जाणून घेऊया डॉ. अक्षय देवधर यांनी या आजाराविषयी दिलेली माहिती काय आहे.


 

हायपोथर्मिया म्हणजे काय?

मानवी शरीराचे सामान्य तपमान 98.6 अंश फॅरनहाइट असते, पण हायपोथर्मियामध्ये हे तपमान कमी होऊन 95 अंशाच्या खाली जाते. वारा आणि थंडीमुळे शरीरातील उष्णता त्वचेतून बाहेर निघून जाते, हे रेडिएशनमुळे घडते व बाकीची फुफ्फुसांद्वारे बाहेर फेकली जाते. उष्णतेच्या निर्मितीपेक्षा तिचा क्षय अधिक जलद होतो. मानवाचा मेंदू अनेक प्रकारे हे आवश्यक तापमान कायम राखत असतो. जेव्हा हे संतुलन बिघडते, तेव्हा शरीरातील उष्णतेचा क्षय होतो व त्यामुळे हायपोथर्मिया होतो.

कारणे 

थंड हवेत शरीर गार हवा, पाणी, बर्फ यांच्या संपर्कात येते आणि कंडक्शनमुळे शरीरातील उष्णतेचा क्षय होतो.वार्‍यामुळे कन्व्हेक्शनद्वारे देखील हा क्षय होतो. हायपोथर्मिया हा बहुतकरून नेहमी आजारी असणार्‍या,वृद्ध माणसांना होतो. 

बेघर, ड्रग्ज घेणार्‍या, दारूचे सेवन करणार्‍या व मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तींना देखील हा संसर्ग होऊ शकतो. कॅम्पिंग किंवा ट्रेकिंग करणार्‍यांना जेव्हा पुरते संरक्षण नसते, व सतत वार्‍याचा सामना करावा लागतो, तेव्हा बर्‍याचदा त्यांचे शरीर हे बदल पचवू शकत नाही व त्यांना हायपोथर्मिया होऊ शकतो.


लक्षणे

हायपोथर्मियामध्ये शरीराचे तपमान जसे 95F (35 से) च्या खाली जाऊ लागते, तशी त्या व्यक्तीला थंडी वाजू लागते, त्याचा रक्तदाब वाढतो, हार्ट रेट व श्वसनाचा दर वाढतो. तपमान खाली खाली जातच राहते व इतर महत्त्वाच्या बाबींवर देखील त्याचा परिणाम होऊ लागतो.


82.4 F (28से) इतक्या कोर तपमानास त्या व्यक्तीचे कुडकुडणे थांबते व ऑक्सीजन शरीरात घेण्याची प्रक्रिया देखील थांबते, ज्यामुळे शुद्ध हरपू लागते व व्यक्ती बेशुद्ध पडते. हृदय गती अनियमित होते व मेंदू शिथिल होतो. ही स्थिती घातक ठरू शकते. तपमान आणि व्यक्ती ज्या वातावरणात असेल, त्यानुसार ही लक्षणे बदलतात.

उपचार

आजारी व्यक्तींची उचित काळजी घेऊन देखभाल करावी लागते. रक्तदाब पूर्ववत करण्यासाठी लोक मसाज करण्याचा प्रयत्न करतात. पण हे टाळले पाहिजे, कारण अतिरिक्त हालचालीमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्या व्यक्तीला ऊबदार चादरीने गुंडाळावे. तसे काही उपलब्ध नसल्यास तुमच्या शरीराच्या उष्णतेचा उपयोग करून त्याच्या शरीराला ऊब देण्याचा प्रयत्न करा.


जर एखाद्या व्यक्तीला हायपोथर्मिया असेल, व ती व्यक्ती शुद्धीत असेल, तर त्याला गरमागरम सूप, चहा किंवा अन्य पेय प्यायला द्या. ऊबदार (गरम नाही) पाण्याची बाटली यासारखे काही कॉम्प्रेसेस मानेवर, छातीवर वापरुन बघा. त्याचे तपमान खूप जास्त ठेवल्यास हृदयविकाराचा झटका संभवतो. या स्थितीत CPR करणे देखील हिताचे आहे. अधिक गंभीर परिस्थितीत वैद्यकीय उपचार घेणे अनिवार्य आहे.


किरकोळ सर्दीचा इलाज घरच्या घरी होऊ शकतो, परंतु जर त्या व्यक्तीच्या हाता-पायांना बधिरपणा आला असेल व त्याच्या शरीराला खूप थरथरत असेल, तर त्यास तत्काळ वैद्यकीय उपचार दिले पाहिजेत. सतत पाण्यात राहिल्याने देखील हायपोथर्मिया होऊ शकतो. अधिक थंड वातावरणाशी शरीराचा संपर्क आल्याने हायपोथर्मिया होतो. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Know the effects of hypothermia in winter with causes and symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.