किडनी स्टोन असताना 'या' पदार्थांचं सेवन पडू शकतं महागात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 18:35 IST2018-08-20T11:03:51+5:302018-08-20T18:35:50+5:30
किडनी स्टोन असताना काय खावे काय खाऊ नये अशा अनेक महत्वाच्या गोष्टी लोकांना माहीत नसतात. आणि या गोष्टी माहीत नसल्याने अनेकांची ही समस्या अधिक वाढते.

किडनी स्टोन असताना 'या' पदार्थांचं सेवन पडू शकतं महागात!
बदलती लाइफस्टाइल, खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे अनेकांना किडनी स्टोनसारख्या वेदनादायी समस्येचा सामना करावा लागत आहे. पण याबाबत असलेल्या अनेक गैरसमजामुळे यावर नेमका उपाय करणं अनेकांना कठिण होऊन बसतं. किडनी स्टोन असताना काय खावे काय खाऊ नये अशा अनेक महत्वाच्या गोष्टी लोकांना माहीत नसतात. आणि या गोष्टी माहीत नसल्याने अनेकांची ही समस्या अधिक वाढते.
किडनी स्टोन होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. पण जास्तीत जास्त ही समस्या खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयींमुळे होते. मीठ आणि शरीरातील इतर खनिज जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा किडनी स्टोन होतो. याचा काही ठरलेला आकार नसतो. कधीकधी हे स्टोन लघवीच्या माध्यमातून बाहेत पडतात पण कधी कधी यामुळे होणाऱ्या वेदना सहस्य होतात.
किडनी स्टोन झाला असता खालील पदार्थ खाऊ नयेत.
१) कोल्ड ड्रिंक्स, मांस, मासे खाऊ नये. फळांमध्ये स्ट्रॉबेरी, बोरं, अंजीर, किशमिश हे खाऊ नये. तसेच दूध आणि दुधापासून तयार केलेले पदार्थ जसे की, दही, पनीर, टॉफी, कॅन सूप, नूडल्स, तळलेले पदार्थ, जंक फूड, चिप्स आणि चहाचं जास्त सेवन करु नये.
२) काही पदार्थांमध्ये ऑक्सलेट असतं जे किडनी स्टोन वाढण्यास कारणीभूत ठरतं. त्यात टोमॅटो, पालक, चवळी, द्राक्ष, सोयाबीन, सोया मिल्क, चीकू, काजू, चॉकलेट, उडीद, चणे, शेंगदाणे या पदार्थांचा समावेश आहे.
३) काही पदार्थांमध्ये किडनी स्टोन तयार करणारे यूरिक अॅसिड आणि प्यूरिनसारखे तत्त्व असतात. त्यामुळे किडनी स्टोन असताना मांस, मासे, वांगी, मशरुम, फ्लॉवर खाऊ नये.
४) किडनी स्टोन असताना मीठाचं सेवन कमी प्रमाणात करावं. जास्त मीठामुळे लघवीमध्ये कॅल्शिअमचं प्रमाण वाढतं. त्यामुळे भाजीमध्ये मीठ कमीच वापरा. त्यासोबतच वरुन मीठ घेणे टाळा.
५) कॅल्शिअम कमी प्रमाणात घेतलेलं बरं होईल. कारण कॅल्शिअम आपल्या शरीरासाठी फार महत्वाचं आहे. पण किडनी स्टोन असताना जास्त कॅल्शिअममुळे समस्या वाढू शकते. त्यामुळे कमी प्रमाणात कॅल्शिअम घ्यावं.
६) कि़डनी स्टोन झाला असताना कोल्ड ड्रिंक, सॉफ्ट ड्रिंक अजिबात सेवन करु नये. कारण हे तयार करण्यासाठी फॉस्फोरिक अॅसिडचा वापर होतो. त्यामुळे किडनी स्टोन असताना यांचं सेवन टाळावे.
७) अल्कोहोलमध्ये प्यूरीन अॅसिड आढळतं. जे किडनी स्टोन तयार होण्यास मदत करतं. त्यामुळे किडनी स्टोन असताना मद्यपान करु नये.