बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 06:09 IST2025-10-05T06:08:55+5:302025-10-05T06:09:04+5:30
एक दिवस येतो जेव्हा बांबू अचानक काही आठवड्यांतच १०-१५ फूट उंच वाढतो. ही झेप एका दिवसातील नसते, तर वर्षानुवर्षांच्या शांत तयारीचं फळ असतं. हीच आहे 'बांबू मेंटॅलिटी.' जीवनाकडे पाहण्याची विचारसरणी काय शिकवते पाहूया...

बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
निसर्गातील प्रत्येक झाडाची वाढ वेगळी असते. काही झाडे रोपल्यावर काही महिन्यांत उगवतात, फांद्या देतात; पण बांबू वेगळाच. बांबू लावल्यानंतर सुरुवातीची काही वर्षे जमिनीवर काहीच बदल दिसत नाही. पाणी घातले, काळजी घेतली तरी वर काही उगवत नाही, असे वाटते; पण खरी जादू आत चाललेली असते. बांबू आपल्या मुळांना खोलवर, भक्कम पसरवत असतो. मग एक दिवस येतो जेव्हा बांबू अचानक काही आठवड्यांतच १०-१५ फूट उंच वाढतो. ही झेप एका दिवसातील नसते, तर वर्षानुवर्षांच्या शांत तयारीचं फळ असतं. हीच आहे 'बांबू मेंटॅलिटी.' जीवनाकडे पाहण्याची विचारसरणी काय शिकवते पाहूया...
संयम : यश त्वरित दिसत नाही म्हणून निराश होणं स्वाभाविक आहे; पण बांबू शिकवतो की संयम हीच ताकद आहे. जसे बांबू सुरुवातीला काही दाखवत नाही, तसे आपल्या आयुष्यातही काही काळ प्रयत्न असूनही परिणाम दिसत नाहीत. पण हा काळ व्यर्थ नसतो; हा काळ आपल्या कौशल्यांचा, सवयींचा पाया बांधण्याचा असतो. संयम ठेवल्यावरच खरी झेप मिळते.
पाया : बांबू उंच वाढतो; कारण त्याने आधी मुळे घट्ट केली असतात. तसेच, आपल्या आयुष्यातील यश टिकावू व्हायचं असेल तर पाया भक्कम असावा लागतो. हा पाया म्हणजे आपल्या कौशल्यांचा साठा, शिस्तीच्या सवयी, प्रामाणिकपणा, आरोग्य आणि नातेसंबंध.
योग्य पाया नसेल तर थोडंसं यश आलं तरी ते टिकत नाही.
झेप : एकदा तयारी पूर्ण झाली की
बांबूसारखी झेप येते. अचानक आलेली संधी, योग्य वेळ, योग्य तयारी हे सगळं मिळून प्रगतीला वेग देते; पण या झेपेचा लाभ त्यांनाच होतो. ज्यांनी संयम ठेवून पायाभूत मेहनत केलेली असते. झेप आली की ती टिकवण्यासाठी नम्रता, शिस्त आणि
व्यवस्थापन गरजेचं आहे.
यातून काय शिकावं?
बांबू मेंटॅलिटी आपल्याला सांगते की, यशासाठी घाई करू नका. संयम ठेवा, पाया घट्ट करा; कारण योग्य वेळ आली की, तुमची झेप आकाशाला भिडेल. आज तुम्ही प्रयत्न करत आहात; पण परिणाम दिसत नाहीत? तर समजा, तुम्ही तुमच्या 'बांबू' टप्प्यात आहात. मुळे घट्ट करत राहा. विश्वास ठेवा. एकदा तुमचा काळ आला की, जग तुम्हाला दुर्लक्ष करू शकणार नाही.
यश म्हणजे केवळ आजची कमाई नव्हे; ती आहे सातत्याने केलेल्या प्रयत्नांची झेप. बांबू आपल्याला शिकवतो. संयम ठेवा, पाया मजबूत करा आणि नंतर उंच झेप घ्या.