- डॉ. राहुल पंडित चेअरमन - क्रिटिकल केअर, सर एचएन रिलायन्स हॉस्पिटल
चीनमध्ये थैमान घालणाऱ्या एचएमपीव्ही (ह्युमन मेटान्यूमो व्हायरस) विषाणूबाबत अचानक सार्वत्रिक चर्चा सुरू झाली आहे. आरोग्याबाबत कमालीची जागरूकता आल्याचे हे लक्षण आहे. कोरोना महासाथीमुळे हे परिवर्त झाले आहे. मात्र, सध्या देश आणि राज्यात या विषाणूची लागण झालेले जे बाधित सापडत आहेत त्यांचा चीनशी काही परस्पर संबंध नाही. कारण गेल्या अनेक वर्षांपासून एचएमपीव्हीची लागण झालेले रुग्ण आपल्याकडे आढळून आले आहेत आणि वैद्यकीय उपचारांनी ते बरेही झाले आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना या विषाणूबद्दल तपशीलवार माहिती असून त्यावरील उपचारही ज्ञात आहेत. त्यामुळे या विषाणूनला घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही, हे प्रथमतः नमूद करणे गरजेचे आहे.
हिवाळ्यात या विषाणूची लागण रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्यांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते. त्यातही बालकांचा समावेश ठळकपणे असतो. सहव्याधीच्या रुग्णांना तसेच जेष्ठ नागरिकांना या विषाणूची लागण होण्याची शक्यता अधिक असते. या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांना ओपीडीमध्ये उपचार दिले जातात. फारच कमी प्रमाणात रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात किंवा अतिदक्षता विभागात दाखल करावे लागते. या आजाराचा संसर्ग होत असला, तरी ज्या नागरिकांमध्ये चांगली रोगप्रतिकारशक्ती आहे. त्यांना हा आजार होत नाही. त्यामुळे नागरिकांनी रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवणे गरजेचे आहे.
कोरोना विषाणूचा उगम चीनमधून झाला होता. त्यामुळे आताही एचएमपीव्ही या व्हायरसचे रुग्ण त्या ठिकाणी अधिक प्रमाणात सापडत असल्याने जनमानसात घबराट निर्माण होणे साहजिकच आहे. मात्र, कोरोना हा नवीन विषाणू होता म्हणून त्याला जागतिक आरोग्य परिषदेने (डब्ल्यूएचओ) नोवेल कोरोना व्हायरस असे म्हटले होते. त्याबद्दल कुणाला काहीच माहीत नव्हते. तो विषाणू कशा पद्धतीने मानवी आरोग्यावर आघात करतो, हे अज्ञात होते. मात्र एचएमपीव्ही हा जुना विषाणू आहे. आपल्याकडे अनेक रुग्णांना यापूर्वीच या विषाणूची लागण झाली असून, रुग्ण उपचार घेऊन घरी गेलेले आहेत.
सौम्य लक्षणे असणारा हा विषाणू असून, यामध्ये सर्दी, खोकला, काही प्रमाणात तापाची लक्षणे रुग्णांमध्ये दिसून येतात. विशेष म्हणजे या विषयावर देशातील अनेक वैद्यकीय संस्थांनी शोधनिबंध मेडिकल जर्नलमध्ये सादर केले आहेत. त्यामुळे या आजाराबद्दल वैद्यकीय वर्तुळाला व्यवस्थित शास्त्रीय माहिती उपलब्ध आहे. सोशल मीडियामध्ये या विषाणूसंदर्भात रंगलेली अशास्त्रीय चर्चा अप्रस्तुत आहे. नागरिकांनी सोशल मीडियावरील एचएमपीव्ही कथांवर विश्वास ठेवू नये.
केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे यापूर्वीच जारी केली आहेत. त्याचे आचरण करावे, कारण वैद्यकीय क्षेत्रातील विविध वैद्यकीय तज्ज्ञ परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. त्यांना जर काही वेगळेपण वाटले, तर ते आरोग्य विभागाला याबाबत अधिक माहिती देत असतात. कोरोनानंतर विषाणूची चाचणी करण्यात सुरुवात झाली. त्याअगोदर अनेक विषाणूंचा संसर्ग नागरिकांना होऊन गेलेला आहे. त्यावेळी त्यांना व्हायरल इन्फेक्शन म्हणून डॉक्टरांनी उपचार केले आहेत.
सध्या खासगी प्रयोगशाळेत या विषाणूची तपासणी होऊ लागली आहे, म्हणून क्वचित एखाद्या रुग्णामध्ये चाचणी करून बघितली जाते. त्यावेळी या विषाणूची लागण झाल्याचे दिसून आले आहे. या विषाणूची चाचणी महाग असून, ती सगळ्याच आजारांमध्ये करणे इष्ट नाही. कारण, सध्या तरी या विषाणूमुळे कोणत्याही प्रकारची हानी दिसून आलेली नाही. सद्यःस्थितीत या विषाणूमध्ये कोणतेही जनुकीय बदल (म्युटेशन) दिसून आलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी निर्धोक रहावे. परंतु सतर्क राहणे केव्हाही चांगले, असेच सांगू शकेन.