कावीळचे योग्य निदान कसे कराल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 12:54 IST2025-01-20T12:54:18+5:302025-01-20T12:54:25+5:30
Health Update: पावसाळा आला, पाणी गढूळ झाले की, कावीळचे रुग्ण वाढू लागतात. पोटातील कावीळ, सफेद कावीळ इ. कावीळचे प्रकार अथवा नाव लोकांकडून ऐकायला मिळतात.

कावीळचे योग्य निदान कसे कराल?
- डॉ. अविनाश सुपे
(पोटविकार तज्ज्ञ)
पावसाळा आला, पाणी गढूळ झाले की, कावीळचे रुग्ण वाढू लागतात. पोटातील कावीळ, सफेद कावीळ इ. कावीळचे प्रकार अथवा नाव लोकांकडून ऐकायला मिळतात. खरे सांगायचे, तर कावीळ ही अनेक प्रकारची असते व कावीळ होण्याची कारणे देखील अनेक असतात. यासाठीच कावीळचे योग्य निदान होणे आवश्यक आहे.
कावीळ होण्याची विविध कारणे :
जंतुसंसर्गामुळे : ज्याला इनइफेक्टिव हेपेटायटिस म्हटले जाते. हेपेटायटिस म्हणजे यकृताला आलेली सूज. जंतुसंसर्गामुळे अति सूक्ष्मजीवाणूच्या संसर्गाने कावीळ होऊ शकते. हेपेटायटिस ए आणि हेपेटायटिस ई विषाणू : हे विषाणू दूषित पाणी वा दूषित अन्नातून आपल्या पोटात जातात. यकृतावर हल्ला करतात व आपण जी कावीळ म्हणतो ती याच मुळे होते. जिची लक्षण पाहून व रक्त तपासणी करून निदान पक्केकरता येते. यामध्ये रुग्णास थकवा व ताप येतो. डोळे पिवळे होतात व लघवी पिवळसर लाल होते. यकृताला सूज येते. रक्त तपासणीमध्ये बिलीरुबीन, एसजीओटी, एसजीपीटी, जीजीटी हे नॉर्मलपेक्षा दुपटीने वाढलेले असते. हेपाटायटीस ए हा सर्वसाधारणपणे लहान मुलांना होतो. पंधरा वर्षांनंतरच्या व्यक्तींना हेपाटायटीस ई होतो.
हेपेटायटिस बी आणि सी : हे विषाणू रक्तातून शरीरात शिरतात. सुरुवातीस साधा ताप व थकवा येतो. कावीळही होते. काही रुग्णांना हा आजार अनेक वर्षे राहतो. त्या मुळे काही वर्षांनंतर त्यांचे यकृत खराब होते. त्यांना सिरॉयसिस होतो व नंतर यकृताचा कर्करोग होण्याची शक्यता असते, म्हणूनच कावीळचे योग्य निदान करणे आवश्यक असते.
हेपेटायटिस बी आणि सी यांची कारणे पुढीलप्रमाणे
१. दूषित रक्त चढवल्याने बी आणि सी विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करतात.
२. इंजेक्शनच्या सुया, सीरिंज वापरणे. शिवाय ऑपरेशनची इन्स्ट्रुमेंट्स जर हेपेटायटिस बी आणि सीच्या पेशंटमुळे इन्फेक्टेड असतील व नीट निर्जंतूक नसतील, तर रुग्णाला हेपेटायटिस बी आणि सी होऊ शकतो.
३. ड्रग ॲडिक्ट : स्वतःला इंजेक्शन मारून घेताना तिथूनही हा विषाणू शरीरात शिरू शकतो. टॅटू करून घेतल्याने हा विषाणू शरीरात शिरू शकतो.
४. असुरक्षित लैंगिक क्रिया : हेपेटायटिस बी किंवा सी झालेल्या व्यक्तीशी कंडोम न वापरता केलेल्या संभोगामुळे हा हेपाटायटीस होतो.
५. आई यामुळे इन्फेक्टेड असेल, तर प्रसूतीच्या वेळी मुलाला हा आजार होऊ शकतो.
कावीळचे निदान :
१. रुग्णाची नीट तपासणी केली जाते - यकृताला किती सूज आहे ? हे पाहिले जाते.
२. विविध रक्ततपासणी करून कुठल्या प्रकारची कावीळ आहे ते शोधले जाते ? तिची तीव्रता कळते.
३. अल्ट्रासोनोग्राफी करून लिव्हरची सूज, तिची साइज, पित्ताशय, पित्तनलिका इ. पाहिले जाते. या पलीकडे सिटी स्कॅन, एमआरआय, एंडोस्कोपी करून पुढचे तपास केले जातात. यकृत किती प्रमाणात खराब झाले आहे, हे वरील तपासणीतून कळते. कावीळचे योग्य निदान आणि वेळेवर उपचार केल्यास बहुतेक रुग्ण पूर्णपणे बरे होतात. मात्र, हे सर्व डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करणे महत्त्वाचे आहे.