'ती'च्या हातचे अन्नच द बेस्ट...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 12:32 IST2026-01-18T12:32:22+5:302026-01-18T12:32:54+5:30
लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब यांसारखे आजार वाढताना दिसतात.

'ती'च्या हातचे अन्नच द बेस्ट...
डॉ. रेणू सिंह-मोकाशी
'घरचे जेवण खा,' हा सल्ला आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. आज त्याचा अर्थ अधिकच स्पष्ट होत चालला आहे. झपाट्याने बदलणाऱ्या जीवनशैलीत बाहेरचे, तयार अन्न सहज मिळते; मात्र ते नेहमीच आरोग्यास पूरक असते असे नाही. बाहेरच्या अन्नात तेल, मीठ, साखर आणि मसाल्यांचा अतिरेक असतो, जो हळूहळू शरीरावर परिणाम करू लागतो. यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब यांसारखे आजार वाढताना दिसतात.
घरच्या अन्नाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वच्छता, काळजी, आपुलकी आणि घरच्या गृहिणीचे प्रेम. स्वयंपाक करताना वापरले जाणारे धान्य, डाळी, भाज्या आपण स्वतः निवडतो. भाजी, चपाती, डाळ, भाजीपाला, भात, कोशिंबीर असा साधा; पण संतुलित आहार शरीराला आवश्यक असलेले पोषण सहज पुरवतो. पचन सुधारते, रोगप्रतिकारकशक्ती वाढते, शरीर हलके वाटते आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते.
अन्नाची योग्य साठवण आणि शिजवण्याची पद्धत यालाही महत्त्व आहे. भाजी फार वेळ शिजवू नये, अन्न वारंवार गरम करू नये आणि उरलेले अन्न योग्य प्रकारे ठेवावे. स्थानिक, हंगामी भाज्यांचा वापर केल्यास अन्न अधिक पौष्टिक ठरते. वेळेवर, शांत मनाने आणि व्यवस्थित बसून घेतलेले जेवण आरोग्यास अधिक लाभदायक ठरते.
कुटुंब एकत्र जेवते तेव्हा संवाद वाढतो
घरच्या जेवणाचा परिणाम केवळ शरीरापुरता मर्यादित राहत नाही. कुटुंब एकत्र बसून जेवते तेव्हा संवाद वाढतो, आपुलकी टिकते आणि मन प्रसन्न राहते. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी घरचे अन्न फार महत्त्वाचे ठरते.
कारण ते त्यांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीस पूरक असते. याशिवाय, घरच्या जेवणामुळे अन्नाची नासाडी कमी होते, खर्चावर नियंत्रण राहते आणि आरोग्यदायी सवयी लागतात.
रोजच्या आहारात विविधता
रोजच्या आहारात विविधता ठेवून सूप, ताक, फळे आणि कडधान्यांचा समावेश केल्यास आहार अधिक समृद्ध बनतो. म्हणूनच आजच्या धकाधकीच्या जीवनात, चव, ट्रेंड किंवा सोयीपेक्षा आरोग्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. नियमितपणे घरचे, साधे आणि संतुलित अन्न घेतल्यास अनेक आजारांपासून दूर राहता येते. घरचे अन्न हीच उत्तम आरोग्याची खरी गुरुकिल्ली आहे.