(Image Credit : Oudtshoorn Courant)
आजकाल अनेक लोक ऑफिसमध्ये कामाच्या वाढत्या ओझ्यामुळे डिप्रेशनचे शिकार होतात. टार्गेटचा वाढता दबाव आणि नोकरी टिकवून ठेवण्याची चिंता यामुळे जास्तीत जास्त लोक स्ट्रेसमध्ये राहू लागले आहेत. आणि सतत स्ट्रेसमध्ये राहिल्याने अनेकजण डिप्रेशनच्या जाळ्यात येतात. अशात त्यांचं ना कामात लक्ष लागत ना घरात.
अनेक चांगल्या कंपन्या ऑफिसमध्ये आपल्या स्ट्रेसमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी काऊन्सिलिंगची सुविधा देतात. जेणेकरुन कर्मचारी नॉर्मल व्हावेत आणि त्यांच्याकडून चांगलं काम व्हावं. पण अशी सुविधा देणाऱ्या कंपन्या फार कमी आहेत. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी ऑफिस स्ट्रेस दूर करण्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत. याने तुम्हाला स्ट्रेस दूर करण्यास आणि डिप्रेशनपासून बचाव करण्यास मदत मिळेल.
संवाद साधा -
तुम्हालाही ऑफिसमधील कामामुळे किंवा वातावरणामुळे स्ट्रेस येत असेल किंवा तुम्ही तणावात असाल तर एकटं राहण्याऐवजी तुम्ही जवळच्या मित्रांशी बोला. अनेकदा वेगवेगळ्या समस्या केवळ कुणाशी संवाद साधल्यानेही सुटू शकतात. तुमच्या मित्राला तुमच्या अडचणींबाबत सविस्तर सांगा आणि यातून बाहेर येण्याचा उपाय जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
फिरायला जा -
सतत टेन्शनमध्ये काम केल्यानंतर थोडा ब्रेक घेणंही गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही नोकरी टिकवण्यासाठी किंवा बॉस काय म्हणेल म्हणून सुट्टीच घेत नसाल तर तुम्ही चूक करताय. शरीर एकप्रकारे मशीनसारखं काम करुन थकत असतं. त्यालाही आरामाची किंवा रिलॅक्स होण्याची गरज असते. त्यामुळे काही दिवस सुट्टी घेऊन कुठे फिरायला जा. याने तुम्हाला शांत वाटेल आणि तुम्ही स्ट्रेसपासूनही दूर रहाल.
आवडीची नोकरी करा -
अनेकजण ते करत असलेल्या नोकरीबाबत किंवा कामाबाबत खूश नसतात. आणि हेच त्यांच्या डिप्रेशनचं, सतत तणावात राहण्याचं मुख्य कारण असतं. अशात तुम्हाला तुम्ही करत असलेलं काम पसंत नसेल तर तुम्हाला जे आवडतं ते काम करा. जे तुम्हाला आवडतं ते कराल ते कामही चांगलं होईल आणि तुम्हालाही चांगलं वाटेल. अर्थात तुम्ही डिप्रेशनपासून दूर रहाल.
चांगले मित्र करा -
अनेकदा आपले वाईच मित्रच आपल्या डिप्रेशनचं कारण ठरतात. त्यामुळे वाईट मित्रांना दूर करुन चांगले, सतत आनंदी राहणारे आणि सकारात्मक मित्र बनवा. सतत दु:खी किंवा नकारात्मक मित्रांमुळे तुमचाही स्ट्रेस वाढू शकतो. त्यामुळे स्वत:हून पायावर कुऱ्हाड मारुन घेण्यापेक्षा चांगल्या मित्रांचा पर्याय शोधलेला बरा.
प्रोफेशनलची मदत घ्या -
जर वर सांगितलेल्या उपायांनंतरही तुमची स्ट्रेसती किंवा डिप्रेशनची समस्या दूर होत नसेल तर अशावेळी जराही वेळ न घालवता मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या. अशा प्रकरणांमध्ये जराही उशीर केल्याने समस्या अधिक वाढू शकते आणि तुम्ही एखाद्या गंभीर मानसिक रोगाचे शिकार होण्याचाही धोका असतो.