टेन्शन वाढलं! देशात व्हायरल इन्फेक्शनचा वेगाने प्रसार; ICMR चा धडकी भरवणारा रिपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 12:08 IST2025-11-20T12:08:25+5:302025-11-20T12:08:46+5:30
भारतात व्हायरल इन्फेक्शन वेगाने वाढत आहेत आणि आयसीएमआरच्या एका नवीन रिपोर्टमुळे ही चिंता आणखी वाढली आहे.

टेन्शन वाढलं! देशात व्हायरल इन्फेक्शनचा वेगाने प्रसार; ICMR चा धडकी भरवणारा रिपोर्ट
भारतात व्हायरल इन्फेक्शन वेगाने वाढत आहेत आणि आयसीएमआरच्या एका नवीन रिपोर्टमुळे ही चिंता आणखी वाढली आहे. आता सर्दी-खोकल्याव्यतिरिक्त, डेंग्यू, चिकनगुनिया, डायरिया आणि हेपेटायटीससारखे आजार देखील पसरत आहेत. आयसीएमआरच्या रिपोर्टनुसार, देशातील नऊपैकी एक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या इन्फेक्शनने ग्रस्त आहे. ४.५ लाख सँपलपैकी ११.१ टक्के सँपलमध्ये व्हायरस आढळले आहेत, ही एक गंभीर परिस्थिती आहे.
रिपोर्टमध्ये अनेक प्रमुख व्हायरस समोर आले आहेत, जसं की एआरआय/एसएआरआयमध्ये इन्फ्लूएंझा ए, खूप ताप असलेल्या रुग्णांमध्ये डेंग्यू, कावीळमध्ये हिपॅटायटीस ए, डायरियामध्ये नोरोव्हायरस आणि मेनिंजायटीसच्या रुग्णांमध्ये एचएसव्ही. यावरून असं दिसून येतं की व्हायरस अनेक पातळ्यांवर सक्रिय असतात. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सौम्य तापाचे रुग्ण नाहीत. मुलं, वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या रुग्णांमध्ये हे इन्फेक्शन अधिक गंभीर होत आहेत, ज्यामुळे रुग्णालयांवर अतिरिक्त दबाव येत आहे.
गर्दी आणि वेगाने वाढणारी लोकसंख्या ही व्हायरसच्या प्रसाराची सर्वात मोठी कारणं आहेत. सार्वजनिक वाहतूक, कार्यालय आणि शहरांमधील बाजारपेठा दररोज लाखो लोकांना एकत्र आणतात, ज्यामुळे इन्फेक्शनचा वेगाने प्रसार होतो. प्रदूषणाचा देखील परिणाम होत आहे. खराब हवेची गुणवत्ता फुफ्फुसे आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतं, ज्यामुळे वारंवार खोकला, सर्दी आणि ताप येण्याचा धोका वाढतो.
कोरोनानंतर रोगप्रतिकारक शक्तीमध्ये होणारे बदल देखील यासाठी कारणीभूत घटक आहेत. कचरा व्यवस्थापनाचे खराब व्यवस्थापन आणि दूषित पाणी हेपेटायटीस, नोरोव्हायरस आणि डायरियासारख्या आजारांच्या वेगाने प्रसारास हातभार लावतात. तज्ज्ञांच्या मते सर्वोत्तम संरक्षण म्हणजे दैनंदिन सवयी. हात धुणे, मास्क लावणे, स्वच्छ पाणी पिणं, डासांपासून लांब राहणं, घराजवळ पाणी साचू न देणं, सकस आहार घेणं, पुरेशी झोप घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.