थकवा, पोटदुखी, चेहराही झालाय निस्तेज; मग या लक्षणांकडे दूर्लक्ष करणं पडेल महागात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 16:17 IST2024-06-20T16:13:41+5:302024-06-20T16:17:31+5:30
पावसाळा आल्याने रोगराईचा धोका अधिक वाढतो.

थकवा, पोटदुखी, चेहराही झालाय निस्तेज; मग या लक्षणांकडे दूर्लक्ष करणं पडेल महागात
Health Tips For Monsoon : पावसाळा आल्याने रोगराईचा धोका अधिक वाढतो. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. पावसाळा आला की तो आपल्यासोबत असंख्य आजारांनाही घेऊन येतो. सर्दी, खोकला यासोबतच कळून न येणारा आजार म्हणजे कावीळ. काविळीची नेमकी लक्षणे काय असतात जाणून घेऊया...
हेपेटायटिस (कावीळ) या आजाराबद्दल आपल्याकडे आजही खूप गैरसमज आहेत, वैद्यकीय शास्त्रात या आजारावर उपचार आहेत. व्हायरल हेपेटायटिसचे पाच प्रकार आहेत. हेपेटायटिस 'ए', 'बी', 'सी', 'डी', आणि 'ई' हे वेगवेगळे प्रकार आहेत. यामध्ये काही जे प्रकार आहेत, ते काही कालावधीमध्ये बरे होतात, तर काही प्रकार आयुष्यभर सोबत असतात, त्यामध्ये 'ए' आणि 'ई' या प्रकारचा कावीळ हा दूषित पाण्यामुळे होतो. यामुळे शरीराच्या यकृतावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात विशेषकरून बाहेरचे पदार्थ खाऊ नये. त्यासोबत स्वच्छ पाणी प्यावे. त्यामुळे या प्रकारच्या काविळीला प्रतिबंध घालण्यास मदत होईल.
लक्षणे काय?
१) त्वचा पिवळी पडणे
२) डोळ्यांचा रंग पिवळा होणे
३) थकवा
४) पोटदुखी
५) चेहरा निस्तेज
काय काळजी घ्याल?
पावसाळ्याच्या काळात शक्यतो उघड्यावरील पदार्थ खाणे टाळले पाहिजे. पाणी दूषित असल्यास पाण्यातून जंतूंचा प्रवेश पोटात होऊ शकतो. त्यामुळे पोटाच्या विविध प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागते. कोणतेही पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. अशावेळी तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, गरम पदार्थ खावेत. अनेकदा असं आवाहन आरोग्यतज्ज्ञांकडून करण्यात येतं.
'हेपेटायटिस ए' आजारावर लस-
हेपेटायटिस ए आणि 'ई' या आजाराचे रुग्ण वर्षभर आढळतात. मात्र, पावसाळ्यात दूषित पाण्याचे प्रमाण वाढते. आजाराचे रुग्ण जास्त दिसतात. दोन्ही आजारांमध्ये रुग्णांना उपचार दिले जातात. हेपेटायटिस ए आणि 'ई' हे आजार दूषित पाण्यामुळे होतात. यामध्ये हेपेटायटिस ए या आजारावर लस विकसित झाली. त्या लसींद्वारे आपण या आजाराला प्रतिबंध घालू शकतो. अनेक लहान बाळाना ही लस दिली जातेः मात्र हेपेटायटिस ई'साठी अजून कोणतीही लस विकसित झालेली नाही.