बदामाचे फायदे तर खूप आहेत, पण या लोकांनी चुकूनही खाऊ नये बदाम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 15:54 IST2023-09-06T15:53:10+5:302023-09-06T15:54:48+5:30
काही लोकांसाठी बदाम खाणं नुकसानकारक ठरतं. चला जाणून घेऊ कोणत्या लोकांनी बदामाचं सेवन करू नये.

बदामाचे फायदे तर खूप आहेत, पण या लोकांनी चुकूनही खाऊ नये बदाम!
बदाम खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. रोज बदाम खाल्ल्याने हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं, डायबिटीस कंट्रोल राहतो, बुद्धीची क्षमता वाढते, वजन कमी होतं, बीपी कंट्रोल राहतो, केस आणि त्वचाही चांगली राहते. पण तरीही काही लोकांसाठी बदाम खाणं नुकसानकारक ठरतं. चला जाणून घेऊ कोणत्या लोकांनी बदामाचं सेवन करू नये.
अॅसिड रिफ्लक्सचा धोका
जर तुम्हाला सतत पोटात जळजळ होण्याची किंवा पोटात अॅसिड तयार होण्याची समस्या असेल तर तुम्ही बदामाचं सेवन कमी करावं. याने तुमची समस्या अधिक वाढू शकते.
किडनी स्टोन
बदामात भरपूर प्रमाणात ऑक्सालेट असतात. शरीरात जास्त प्रमाणात ऑक्सीलेट झाले तर किडनी स्टोन होण्याचा धोका जास्त वाढतो. त्यामुळेच बदामाचं कमी प्रमाणात सेवन करा. ज्यांना किडनी स्टोन आहे त्यांनी तर चुकूनही बदाम खाऊ नये.
पोट फुगण्याची समस्या
बदामात फायबरचं प्रमाण अधिक असतं आणि याचं जास्त सेवन केलं तर पोटात जडपणा जाणवतो. म्हणजे पोट फुगण्याची समस्या होते. इतकंच नाही तर तुम्हाला जुलाब आणि पोट दुखण्याची समस्याही होऊ शकते.
अॅलर्जीची समस्या
बदाम किंवा नट्सच्या सेवनाने काही लोकांना अॅलर्जीची समस्या होऊ शकते. जर तुम्हाला नट्सची अॅलर्जी आहे तर बदामाचं सेवन करणं टाळा. काही लोकांना बदामाचं सेवन केल्याने ओरल अॅलर्जी सिंड्रोमची समस्या होऊ शकते. अशात घशात खवखव, ओठांवर सूज येण्याची समस्या होऊ शकते.