तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 11:47 IST2025-09-12T11:46:52+5:302025-09-12T11:47:42+5:30
पहिल्यांदाच लठ्ठपणाचे प्रमाण कमी वजनाच्या तुलनेत जास्त आढळले आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, हृदयविकाराचा धोका वाढतो.

तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र बाल कोष (युनिसेफ) च्या ताज्या अहवालानुसार, जगभरातील मुलांमध्ये आणि किशोरवयीनांमध्ये आता कमी वजनापेक्षा लठ्ठपणाची समस्या झपाट्याने वाढत आहे. २०२० ते २०२२ या काळातील आकडेवारीच्या आधारे सादर केलेल्या या अहवालात २०३५ पर्यंत लठ्ठपणा ही गंभीर आरोग्य व आर्थिक समस्या ठरू शकते, असा इशारा देण्यात आला आहे.
पहिल्यांदाच लठ्ठपणाचे प्रमाण कमी वजनाच्या तुलनेत जास्त आढळले आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, हृदयविकाराचा धोका वाढतो.
भारतातही वाढती चिंता
भारतातील शहरी भागांमध्ये मुलांमध्ये आणि किशोरवयीनांमध्ये लठ्ठपणा झपाट्याने वाढत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अलीकडेच लाल किल्ल्यावरून भाषण करताना लठ्ठपणा हा भविष्यातील मोठा आरोग्यसंकट ठरू शकतो, अशी गंभीर चिंता व्यक्त केली होती.
लठ्ठपणा वाढण्यामागील कारणे
जंक फूड, अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्नपदार्थ आणि साखरयुक्त पेयांचे वाढते सेवन
मुलांना आकर्षित करण्यासाठी होणारे आक्रमक डिजिटल आणि दूरदर्शनवरील जाहिराती
शारीरिक हालचालींमध्ये सातत्याने होत असलेली घट
अहवालातील ठळक मुद्दे
वर्ष २००० मध्ये ५ ते १९ वयोगटातील केवळ ३% मुले लठ्ठ होती, तर १३% मुले कमी वजनाची होती.
२०२२ पर्यंत लठ्ठपणाचे प्रमाण ९.४% पर्यंत वाढले, तर कमी वजनाचे प्रमाण घटून ९.२% झाले.
सध्या जगभरातील सुमारे १८८ दशलक्ष मुले लठ्ठपणाने ग्रस्त आहे.
उप-सहारा आफ्रिका आणि दक्षिण आशिया वगळता जवळजवळ सर्व प्रदेशांत लठ्ठपणाचे प्रमाण जास्त आहे.
२०३५ पर्यंत लठ्ठपणामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर दरवर्षी ४ ट्रिलियन डॉलर्सहून अधिकचा बोजा पडू शकतो.