Hair loss in Men: तरुण वयातच टक्कल पडायला सुरुवात होते, पुरुषांच्या केसगळतीची आहेत ही चिंताजनक कारणं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 16:21 IST2022-02-14T15:31:46+5:302022-02-14T16:21:51+5:30
हल्ली महिला-पुरुष अशा दोघांनाही कमी वयात केस गळण्याचा त्रास (Hair loss problems) होतो. याची अनेक कारणं असू शकतात.

Hair loss in Men: तरुण वयातच टक्कल पडायला सुरुवात होते, पुरुषांच्या केसगळतीची आहेत ही चिंताजनक कारणं
आपले केस दीर्घायुष्यासाठी काळे आणि दाट असावेत आणि ते फारसे तुटू नयेत, असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी केसांचीही योग्य काळजी घेणं आवश्यक आहे. हल्ली महिला-पुरुष अशा दोघांनाही कमी वयात केस गळण्याचा त्रास (Hair loss problems) होतो. याची अनेक कारणं असू शकतात. केसांची काळजी न घेणं, केसांना तेल न लावणं, अनेक दिवस केस न धुणं, केसांसाठी बाजारात मिळणारी रासायनिक उत्पादनं जास्त वापरणं, डोक्याच्या त्वचेला संसर्ग होणं, शरीरातील स्रावांचं असंतुलन, शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता, औषधं, कोणताही रोग यामुळं केस गळू (Hair loss) लागतात.
याशिवाय, चुकीच्या आहारामुळेही केस गळण्याची समस्या सुरू होते. बहुतेक पुरुष त्यांच्या आहाराकडे व्यवस्थित लक्ष देत नाहीत. आहारात आवश्यक पोषक तत्त्वांची कमतरता असल्यास किंवा जास्त तळलेले, साखरयुक्त पदार्थ, अल्कोहोल, मसालेदार, जंक फूड, बाहेरचं अन्न खाल्लं तर केसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. जाणून घ्या, आहारातील कोणत्या चुकांमुळं लहान वयातच केस (Diet Mistakes which Causes Hair Fall in Men) गळू लागतात.
जास्त साखर खाल्ल्यानं केस गळतात
जर तुमचे केस काही दिवसांपेक्षा जास्त काळ गळत असतील तर ते जास्त साखर खाण्यामुळं देखील असू शकते. अनेकांना केक, मिठाई, चॉकलेट्स, कँडीज आदी गोड पदार्थ खाण्याची इच्छा होऊ लागते. त्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नाही. OnlyMyHealth नुसार मिठाई खाण्यात काहीच गैर नाही. पण ती मर्यादित प्रमाणात खा. साखरेचे पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असतात. त्यात प्रक्रिया केलेली साखर असते, ज्यामध्ये पौष्टिक मूल्य नगण्य असतं. यामुळं केसांचं नुकसान तर होतंच; पण केस गळण्याचीही शक्यता असते. जास्त साखर रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढवते, यामुळं इन्सुलिनचं उत्पादन जास्त होते आणि शरीरातील एंड्रोजनची पातळी वाढते. हार्मोन्समध्ये असे चढउतार झाल्यामुळं केस गळण्याचं प्रमाण वाढू शकतं. याशिवाय साखरयुक्त पदार्थांच्या अतिसेवनानं वजन वाढणं, दातांच्या समस्या, कर्करोग, हृदयविकार, मधुमेह, नैराश्य, त्वचा वृद्धत्वाकडे झुकु लागणं अशा अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात.
मद्यपान केल्यानं केस गळतात
काही लोकांना रोज दारू पिण्याची सवय असते. मर्यादित प्रमाणात अल्कोहोल प्यायल्यानं फारसं नुकसान होत नाही. परंतु, दररोज सेवन केल्यानं भूक मंदावणं, कमकुवत प्रतिकारशक्ती, डोकेदुखी, निद्रानाश, कामात लक्ष न लागणं, तणाव, जळजळ, गोळा येणं, पक्षाघात, उच्च रक्तदाब, यकृताचे आजार होण्याची शक्यता वाढते. याचा केसांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो आणि केस गळायला लागतात. अल्कोहोलमुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी (निर्जलीकरण - dehydration) होते. यामुळं केसांची मुळं कोरडी होतात. त्यामुळं केस गळण्याची समस्या आणखी वाढते.
तळलेले, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने केस गळण्याचं प्रमाण वाढतं
काही लोकांना रोज बाहेरचं अन्न खाण्याची सवय असते. जंक फूड, स्ट्रीट फूड, चाट-पकोडे, फ्रेंच फ्राईज खायला चविष्ट असतात, पण त्यांच्या अतिसेवनानं केस गळण्याची समस्या वाढते. तळलेले, मसालेदार पदार्थ खाल्ल्यानं टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते. यामुळं स्टिरॉइड हार्मोन्स कमी होतात. त्यामुळं पुरुष आणि महिलांचेही केस गळायला लागतात.
दुग्धजन्य पदार्थांमुळेही केस गळतात
अर्थात, दुग्धजन्य पदार्थ हे आरोग्यासाठी पौष्टिक अन्न मानले जातात, परंतु तुम्हाला हे माहित आहे का की ते केस गळण्यास कारणीभूत ठरू शकतात? होय, दुग्धजन्य पदार्थांमध्ये चरबीचे प्रमाण असते, ज्यामुळे शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते. जेव्हा शरीरात या टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण वाढते तेव्हा केस गळण्याची समस्या सुरू होते. जर तुम्हाला आधीच कोंडा, एक्जिमा, सोरायसिस सारख्या समस्या असतील, तर दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यानं केस गळणं आणखी वाढतं. त्यांचा आहारात मर्यादित प्रमाणात समावेश करणं चांगलं.
पिष्टमय पदार्थ (Starchy foods) खाल्ल्यानं केस गळतात
पास्ता, ब्रेड आदी पिष्टमय पदार्थांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. यामुळं अतिरिक्त इन्सुलिन तयार होऊन एंड्रोजनची पातळी वाढते. यामुळं केसांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांचं सेवन केल्यानं तणाव वाढतो. हे केस गळण्याचं एक कारण आहे.