शरीराच्या आतच कर्करोगाशी लढणार ‘फ्रेंडली बॅक्टेरिया’, आयआयएसईआरचा महत्त्वाचा शोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 05:41 IST2025-10-10T05:41:16+5:302025-10-10T05:41:32+5:30
उपचारावर सतत लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र देखरेख प्रणालीही तयार करण्यात आली आहे. त्यामुळे उपचार किती परिणामकारक ठरत आहेत, हेही डॉक्टरांना समजू शकेल.

शरीराच्या आतच कर्करोगाशी लढणार ‘फ्रेंडली बॅक्टेरिया’, आयआयएसईआरचा महत्त्वाचा शोध
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (आयआयएसईआर) कोलकात्याच्या संशोधकांनी असा ‘फ्रेंडली बॅक्टेरिया’ विकसित केला आहे, जो रुग्णाच्या शरीरात जाऊन थेट कर्करोगाशी लढाई करू शकतो. विशेष म्हणजे, या उपचारावर सतत लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र देखरेख प्रणालीही तयार करण्यात आली आहे. त्यामुळे उपचार किती परिणामकारक ठरत आहेत, हेही डॉक्टरांना समजू शकेल.
या प्रकल्पाला ‘रीसेट’ (रिप्रोग्रॅमिंग द सप्रेसिव्ह एन्व्हायर्न्मेंट ऑफ ट्युमर मायक्रोएन्व्हायर्न्मेंट) असे नाव दिले आहे.
टी रेग्युलेटरी सेल महत्त्वाच्या
कॅन्सर प्रामुख्याने ‘टी रेग्युलेटरी सेल्स’ (ट्रेग्स) नावाच्या प्रतिकारक पेशींच्या आड दडतो. त्यामुळे शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. या मुळे इम्यूनोथेरपी, किमोथेरपी उपचार अनेकदा अपेक्षित परिणाम देत नाहीत.
प्रोबायोटिक्स ट्यूमर ओळखून औषध बनणार
आयआयएसईआर कोलकात्याची ११ सदस्यीय टीम आता अशा प्रोबायोटिक्स तयार करत आहे, जे ट्यूमरला ओळखून त्याची क्रिया थोपवतील. हे अनुकूल सूक्ष्मजीव म्हणजे जिवंत व लक्ष्यित औषध बनतील आणि शरीराच्या आतूनच कर्करोगावर मात करण्यात मदत करतील.
या महिन्यात ही टीम पॅरिसमध्ये होणाऱ्या जगातील सर्वांत मोठ्या ‘आयजीईएम ग्रँड जम्बुरी २०२५’ या सिंथेटिक बायोलॉजी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
ब्रिटनमध्ये महत्त्वाचा शोध
लंडनमधील इम्पिरियल कॉलेज आणि जर्मनीतील कोलोन विद्यापीठ येथील संशोधकांनीही ट्यूमरच्या आतील बॅक्टेरियांचा अभ्यास केला.
त्यांनी शोधलेला २-मिथाइल आइसोसाइट्रेट नावाचा अणू कर्करोगाच्या पेशींना कमकुवत करतो. या शोधामुळे भविष्यात बॅक्टेरियाच्या मदतीने कॅन्सरवर प्रभावी उपचार होऊ शकतील, अशी वैज्ञानिकांची अपेक्षा आहे.
त्यांनी शोधलेला २-मिथाइल आइसोसाइट्रेट नावाचा अणू कॅन्सरच्या पेशींना कमकुवत करतो. या शोधामुळे भविष्यात बॅक्टेरियाच्या मदतीने कॅन्सरवर प्रभावी उपचार होऊ शकतील.