उपवासाच्या आधी व्यायाम करा, होतील अधिक फायदे, संशोधनात दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 03:48 PM2021-12-01T15:48:45+5:302021-12-01T15:48:55+5:30

'उपवासाच्या आधी व्यायाम (Exercise) केल्यास उपवासामुळे आरोग्याला मिळणारे फायदे आणखी वाढतात.' अमेरिकेच्या ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीच्या (Brigham Young University) या अभ्यासाचे निष्कर्ष 'मेडिसिन अँड सायन्स इन स्पोर्ट्स अँड एक्सरसाइज'मध्ये (Medicine and science in sports and exercise) प्रसिद्ध झाले आहेत.

exercise before fasting helps or benefits your health more | उपवासाच्या आधी व्यायाम करा, होतील अधिक फायदे, संशोधनात दावा

उपवासाच्या आधी व्यायाम करा, होतील अधिक फायदे, संशोधनात दावा

Next

अनेक जण उपवास (Fasting) करतात. परंतु उपवास करण्यापूर्वी भरपूर खावं आणि उपवास करताना श्रम करू नये, अशीच उपवासाची अनेकांची संकल्पना असते. तुम्हीदेखील तसाच विचार करीत असाल, तर नुकत्याच झालेल्या एका संशोधनामुळे तुमचं मत बदलू शकतं. या अभ्यासात असं सांगण्यात आलं आहे, की 'उपवासाच्या आधी व्यायाम (Exercise) केल्यास उपवासामुळे आरोग्याला मिळणारे फायदे आणखी वाढतात.' अमेरिकेच्या ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीच्या (Brigham Young University) या अभ्यासाचे निष्कर्ष 'मेडिसिन अँड सायन्स इन स्पोर्ट्स अँड एक्सरसाइज'मध्ये (Medicine and science in sports and exercise) प्रसिद्ध झाले आहेत.

ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीचे संशोधक लँडन डेरू (Landon Deru) यांनी सांगितलं, की 'उपवासाच्या वेळी व्यायामामुळे मेटाबॉलिझम प्रक्रियेत बदल होऊ शकतो का, हे आम्हाला जाणून घ्यायचं होतं. जेव्हा शरीरातल्या ग्लुकोजचं प्रमाण संपतं, तेव्हा शरीरात कीटॉसिसची (ketosis) प्रक्रिया सुरू होते. यानंतर, शरीराच्या ऊर्जेच्या गरजा भागवण्यासाठी शरीरात आधीच जमा झालेल्या चरबीचं विखंडन (Fragmentation) सुरू होतं आणि या रासायनिक प्रक्रियेत बायप्रॉडक्टच्या रूपात कीटोन्स तयार होतात. मेंदू आणि हृदयासाठी निरोगी ऊर्जास्रोत असण्यासोबतच कीटोन्स कॅन्सर, पार्किन्सन्स आणि अल्झायमरसारख्या आजारांशी लढण्यासाठीदेखील उपयुक्त आहेत.'

असं केलं संशोधन
संशोधकांनी हा अभ्यास करीत असताना 20 निरोगी व्यक्तींना केवळ पाणी पिऊन 36-36 तास उपवास करण्यास सांगितलं. दोन्ही उपवास पुरेसं जेवण जेवल्यानंतर सुरू करण्यात आले होते. पहिला उपवास कोणत्याही व्यायामाशिवाय सुरू झाला, तर दुसऱ्या उपवासाची सुरुवात ट्रेडमिल वर्कआउटने झाली. या वीस जणांचे उपवास सुरू असताना ते जागे असताना प्रत्येक दोन तासांनी त्यांच्या मनःस्थितीचं मूल्यांकन केलं गेलं. त्यांच्या बी-हायड्रॉक्सीब्युटाइरेट (बीएचबी) पातळीचीदेखील नोंद केली गेली. हे कीटोनसारखं रसायन आहे.

व्यायामामुळे खूप फरक जाणवला
जेव्हा त्यांनी व्यायाम करण्यासह उपवास सुरू केला, तेव्हा कीटॉसिसची प्रक्रिया सरासरी तीन ते साडेतीन तास आधी सुरू झाली. तसंच त्यांच्यामध्ये ४३ टक्के जास्त बीएचबी तयार झालं. यामागचा सामान्य सिद्धांत असा आहे, की व्यायामामुळे शरीरातलं ग्लुकोज योग्य प्रमाणात बर्न होतं. त्यामुळे कीटॉसिसच्या संक्रमणास गती मिळते. व्यायाम न करणार्‍यांमध्ये २० ते २४ तासांनंतर कीटॉसिसची प्रक्रिया सुरू होते.

या संशोधनाचे सह-लेखक ब्रूस बेली (Bruce W Bailey) म्हणतात, 'उपवास सुरू असतानाचा २० ते २४ तासांचा वेळ खूप कठीण असतो. अशा परिस्थितीत उपवास २४ तासांपूर्वी सोडता यावा. पण आरोग्याला होणारे फायदे सारखेच असावेत, यासाठी काय करता येईल, असा प्रश्न उपस्थित होत होता. यासाठी 24 तासांचा उपवास व्यायामासोबत सुरू करता येईल. पण यासाठी काही सावधगिरी बाळगणंदेखील आवश्यक आहे.'

बेली पुढे म्हणाले, की 'तुम्ही भरपूर अन्न खाल्ल्यानंतर व्यायाम करून उपवास सुरू केलात, तर तुमच्यामध्ये कीटॉसिसची प्रक्रिया अनेक दिवस सुरू होत नाही. त्यामुळे उपवास सुरू करण्यापूर्वी मध्यम आहार घेणं आवश्यक आहे.'

हे लक्षात ठेवा
टाइप 1 मधुमेह किंवा इतर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींनी उपवास करू नये, अन्यथा 24 तास उपवास करणं त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतं; पण जे निरोगी आहेत, त्यांनी आठवड्यातून एकदा तरी 24 तास किंवा त्यापेक्षा जास्त उपवास करावा. स्वत:ला सुरक्षित ठेवताना तुम्ही जितक्या जास्त कॅलरीज बर्न कराल तितक्या वेगाने कीटॉसिसची प्रक्रिया सुरू होईल आणि उपवासाचे तुम्हाला अधिक फायदे मिळतील. याचाच अर्थ उपवासाच्या वेळी काम करत राहणं चांगलं आहे.

Web Title: exercise before fasting helps or benefits your health more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.