डाॅक्टरसाहेब, मधुमेह होऊच नये, यासाठी काय करावे? चाळिशीनंतर करा नियमित तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 08:44 IST2025-11-14T08:38:44+5:302025-11-14T08:44:39+5:30
Health News: मधुमेहाचे सावट तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांवर पसरत चालले आहे; पण हा आजार होऊन मग नियंत्रणात ठेवण्यापेक्षा, तो होऊच नये, यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. योग्य सवयींची सातत्याने साथ मिळाली, तर मधुमेहाचा धोका टाळता येतो, असे मधुमेहतज्ज्ञांनी सांगितले.

डाॅक्टरसाहेब, मधुमेह होऊच नये, यासाठी काय करावे? चाळिशीनंतर करा नियमित तपासणी
छत्रपती संभाजीनगर - मधुमेहाचे सावट तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांवर पसरत चालले आहे; पण हा आजार होऊन मग नियंत्रणात ठेवण्यापेक्षा, तो होऊच नये, यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. योग्य सवयींची सातत्याने साथ मिळाली, तर मधुमेहाचा धोका टाळता येतो, असे मधुमेहतज्ज्ञांनी सांगितले.
मधुमेह हा ‘स्लो पाॅयझन’सारखा शरीरावर दुष्परिणाम करतो. पुन:पुन्हा त्वचेचा संसर्ग होणे, लघवीचा संसर्ग होणे, हार्ट अटॅक, किडनी खराब होणे, लकवा, डोळ्याच्या पडद्यावर, पायाच्या नसांवर दुष्परिणाम होतो.
१०० पैकी ६ ते १० जणांना मधुमेह : १०० सामान्य व्यक्तींमध्ये सुमारे
६ ते १० जणांना मधुमेहाचा धोका आहे. एका अभ्यासानुसार भारतातील प्रौढ लोकांमध्ये (वय २०–७९) मधुमेहाचे प्रमाण ८.९ टक्के आहे. ४५ वर्षांवरील लोकांमध्ये मधुमेहाचे प्रमाण
१९.८ टक्के आहे.
ही घ्या काळजी
ताटातील अर्धा भाग भाज्यांनी आणि सलाडने भरलेला असावा.
दैनंदिन आहारात संपूर्ण धान्य, भरपूर पाणी, डाळी, फळे यांचा समावेश करणे.
तळलेले पदार्थ, फास्टफूड, थंड पेये, पॅकेज्ड स्नॅक्स यापासून शक्य तितके दूर राहणे.
रोज किमान ३० ते ४५ मिनिटे चालणे, धावणे किंवा योगासन करणे.
दर तासाला काही क्षण उभे राहणे, स्ट्रेच करणे, चालणे.
झोप पूर्ण घेणे. दिवसाला ७ ते ८ तास.
ज्यांच्या घरात कुणाला मधुमेह आहे, त्यांनी अधिक खबरदारी घ्यावी. सकस आहार घ्यावा. चाळिशीनंतर प्रत्येकाने नियमितपणे तपासणी करावी.
- डाॅ. नीलेश लोमटे, मधुमेह व हार्मोन्सतज्ज्ञ
जीवनशैलीतील बदलांद्वारे मधुमेहाचा धोका कमी करू शकतो. संतुलित, पौष्टिक आहार घ्यावा. साखर, बेकरी, बाहेरचे, मैद्याचे, तळलेले पदार्थ टाळावेत.
- डाॅ. मयुरा काळे, मधुमेहतज्ज्ञ