(Image Credit : aafp.o)
काही मानसिक त्रास झाला की, ते तणावाचं कारण बनतं. वेगवेगळ्या कारणांनी येणाऱ्या तणावावर जर वेळीच उपचार केला गेला नाही तर याने डिप्रेशन येऊ शकतं. त्यानंतर डिप्रेशन इतर शारीरिक समस्यांना आमंत्रण देतं. जसे की, हाय ब्लड प्रेशर, मधुमेह, हृदयरोग, थायरॉइड इत्यादी. आजच्या या तणावपूर्ण आणि धावपळीच्या लाइफस्टाइलमध्ये अनेकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. सतत होणारा मानसिक दबाव आणि तणाव यामुळे वेगवेगळे मानसिक विकारही सुरु होतात. ज्यात डिप्रेशन ही सर्वात घातक स्थिती आहे. याने कोणकोणते आजार होऊ शकतात हे खालीलप्रमाणे पाहता येईल.
डायबिटीज - डिप्रेशनमुळे व्यक्तीला डायबिटीज होऊ शकतो. एका शोधानुसार, डिप्रेशनमुळे डायबिटीजची समस्या अधिक वाढू शकते. तज्ज्ञांचं मत आहे की, डायबिटीज चिंता आणि तणावाच्या कारणामुळेही होऊ शकतो. जर तुम्ही डिप्रेशनचे शिकार असाल तर सामान्य व्यक्तीच्या तुलनेत तुम्हाला डायबिटीज होण्याचा धोका दुप्पट असतो.
जाडेपणा - जे लोक डिप्रेशनमध्ये असतात ते एकटं राहणं पसंत करतात. ते कुणालाही भेटत नाहीत, कुणात मिक्स होत नाही त्यामुळे त्यांची शारीरिक हालचाल कमी होते. त्यासोबतच काही लोकांना डिप्रेशन असेल तर खूप खाण्याची किंवा फास्ट फूड खाण्याचीही सवय असते. त्यामुळे याने जाडेपणाची समस्याही होते.
डिमेंशिया - एका शोधानुसार, डिप्रेशनने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये डिंमेशिया होण्याचा धोका सामान्य व्यक्तीच्या तुलनेत अधिक असतो. डिमेंशियामुळे व्यक्तीच्या मानसिक क्षमता, व्यक्तिमत्त्व आणि व्यवहारावर प्रभाव पडतो. तसेच जे लोक डिमेंशियाचे शिकार आहेत त्यांच्या स्मरणशक्तीवरही वाईट प्रभाव पडतो.
कॅन्सर - कॅन्सरचे जवळपास ६० टक्के रुग्ण हे डिप्रेशनचे शिकार असतात. कारण डिप्रेशनमुळे व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती बदलते, कमजोर होते. कोणत्याही व्यक्तीला डिप्रेशनची समस्या होण्यामागे मनोवैज्ञानिक, सामाजिक, आनुवांशिक आणि जैव वैज्ञानिक कारण असू शकतं. डिप्रेशनने ग्रस्त व्यक्तीवर सामान्यपणे उपचार सायकोथेरपीच्या माध्यमातून केले जातात.
अवेळी वृद्धत्व - पोस्ट ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसॉर्डर या मानसिक आजाराने ग्रस्त लोकांना वेळेआधीच वृद्धत्त्व येण्याचा धोका असतो. पीटीएसडी एक डिप्रेशन, राग, अपुरी झोप, खाण्या-पिण्यासंबंधी समस्या किंवा मद्यसेवन यामुळे होणारा मानसिक आजार आहे.
हृदयरोग - बालपणीच आलेल्या डिप्रेशनचा जर वेळीच उपचार केला नाही तर तरुणपणी हृदयरोगाचा सामना करावा लागू शकतो. डिप्रेशन असलेल्या लहान मुलांमध्ये जाडेपणा, क्षमता कमी असणे आणि धुम्रपानाची सवय होते. याने तारुण्यातच हृदयरोग होण्याचा धोका अधिक असतो.