Coronavirus pregnant women at risk of malaria, dengue; Being similar to the symptoms was deceptive | Coronavirus: कोरोनाग्रस्त गर्भवतींना मलेरिया, डेंग्यूचा धोका; लक्षणे सारखीच असल्याने फसगत 

Coronavirus: कोरोनाग्रस्त गर्भवतींना मलेरिया, डेंग्यूचा धोका; लक्षणे सारखीच असल्याने फसगत 

मुंबई : कोरोनाग्रस्त गर्भवती महिलांना डेंग्यू, मलेरियाचीही लागण होत असून, त्यात त्यांची प्रकृती खालवत असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थेच्या (नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ)च्या अभ्यासातून ही बाब समोर आली.

एनआयआरआरएचने कोरोनाग्रस्त गर्भवती महिला उपचारासाठी दाखल झाल्यास त्यांची मलेरिया आणि डेंग्यू चाचणी करावी, अशा सूचना डॉक्टर व रुग्णालयांना केल्या आहेत. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात, असे सहा रुग्ण आढळल्याचेही एनआयआरआरएचने अभ्यासात नमूद केले आहे. शेकडो कोरोनाग्रस्त गर्भवती महिला कोरोनावर मात करून प्रसूती होऊन सुरक्षित घरी गेल्या. ही सकारात्मक बाब असली, तरी त्यांची काळजी घेणे सद्यस्थितीत अत्यंत आवश्यक आहे, असे डॉक्टर सांगतात.

गर्भवतींना कोरोनाची लागण होण्याची भीती अधिक असून, त्यामुळे बाळंतपणात अडचणी येण्याची शक्यता असते. कोरोनाग्रस्त मातेच्या नाळेतून पोटातील बाळाला कोरोनाचा संसर्ग होत असल्याची, गर्भपात होत असल्याचीही उदाहरणे समोर आली आहेत. नायरमधील अशाच सहा रुग्णांमधील लक्षणे उपचारांनंतरही कायम असल्याने त्यांची मलेरिया आणि डेंग्यूची चाचणी करण्यात आली. तेव्हा काहींना कोरोनासह मलेरिया तर काहींना डेंग्यूही झाल्याचे निदान झाले.त्यानंतर, त्यांच्यावर मलेरिया-डेंग्यूचे उपचार करण्यात आले. वेळेत निदान झाल्याने आणि उपचार मिळाल्याने त्यांचा आजार बळावला नसल्याची माहिती एनआयआरआरएचचे शास्त्रज्ञ डॉ. दीपक मोदी यांनी दिली. गर्भवती रुग्णांची कोरोना चाचणी, तसेच मलेरिया-डेंग्यू चाचणीही करावी, अशा सूचना एनआयआरआरएचने दिल्या.

लक्षणे सारखीच असल्याने होते फसगत
कोरोना आणि मलेरिया, डेंग्यूची लक्षणे सारखीच असल्याने कोरोनाचीच चाचणी व उपचार होतात. कोरोनामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने मलेरिया, डेंग्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे आता मलेरिया, डेंग्यूचीही चाचणी आवश्यक आहे, असे डॉ.मोदी यांनी स्पष्ट केले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus pregnant women at risk of malaria, dengue; Being similar to the symptoms was deceptive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.