Controlling family diabetes by making lifestyle changes | जीवनशैलीत बदल करून कुटुंबाचा मधुमेह करा नियंत्रित

जीवनशैलीत बदल करून कुटुंबाचा मधुमेह करा नियंत्रित

मुंबई : जगभरात मधुमेहाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. भारतात मधुमेहाचे प्रमाण वाढत असतानाच, इतर गंभीर आरोग्य समस्यादेखील बळावताना दिसून येत आहेत. यात सर्वात महत्त्वाच्या आहेत हृदयाच्या समस्या, ज्या आपल्या देशात लहान वयातील तरुणांमध्येही दिसून येत आहेत. याशिवाय देशात ७२ दशलक्षहून अधिक लोकांना मधुमेह आहे, असे इंटरनॅशनल डायबेटिस फाउंडेशनद्वारे सांगण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या १४ नोव्हेंबर, जागतिक मधुमेह दिनाच्या ‘कुटुंब आणि मधुमेह’ या संकल्पनेनुसार, मधुमेहावर नियंत्रण मिळवायचे असल्यास, कुटुंबाच्या आहार व जीवनशैलीत बदल करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
रक्तातील साखरेचा स्तर नियंत्रणात असला, तरी मधुमेह प्रकार २ हा तरुण पिढीत आढळून येत असल्याने, त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. शिवाय त्यांच्यात हृदयविकारांच्या धोक्यांमध्येही वाढ होते. याचाच अर्थ हृदयाच्या आरोग्याप्रती असलेले धोके कमी करण्याकरिता जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे.
मधुमेह असणाऱ्या रुग्णांना हृदयविकाराचा झटका येणे आणि स्ट्रोकचा अधिक धोका असू शकतो. यामागचे कारण असे की, त्यांच्या रक्तातील साखर बºयाचदा वाढलेली आणि अनियंत्रित असते. यामुळे शरीरातील बºयाच रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे हृदयाला मिळणारे आॅक्सिजन अपुरे पडू शकते आणि त्यामुळे हृदयाच्या आजारांना आमंत्रण मिळते व हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. धूम्रपान, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉलच्या स्तरासह मधुमेह हादेखील हृदय विकार होण्यासाठी जबाबदार असू शकतो. रुग्णांसाठी सर्वात आव्हानात्मक गोष्ट म्हणजे दीर्घकाळापर्यंत अशा परिस्थितीशी लढा देणे. त्यांनी हृदय विकाराच्या धोक्यांप्रती अशा पद्धतीने लढावे, ज्या पद्धतीने हृदयविकाराचा झटका आलेले रुग्ण नियमितपणे लढतात, ज्येष्ठ हृदयविकारतज्ज्ञ डॉ. जमशेठ जे. दलाल यांनी सांगितले.
मधुमेहाची औषधे नियमितपणे घ्यायला हवीत. ही नियमित घेण्यामागचे कारण असे की, जरी आपल्या रक्तातील साखरेचा स्तर सामान्य असला, तरी आपल्याला हृदयरोगाचा धोका आणि दीर्घकालीन मधुमेहाच्या गुंतागुंतीचा धोका उद्भवू शकतो. डॉक्टरांशी सल्लामसलत केल्याशिवाय कोणतीही औषधे बंद करणे किंवा थांबविणेदेखील योग्य नाही, असे इंडियन अकॅडमी आॅफ डायबेटिसचे अध्यक्ष असलेले डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.
हृदयाच्या आरोग्यास असलेले धोके जाणून घेण्याकरिता डॉक्टरांशी बोला. मधुमेह असणाऱ्यांकरिता स्वत:ला असलेले धोके त्वरित जाणू घेणे आवश्यक आहे, आपल्या लिपिड लेवल्स तपासून घ्या, हृदयाशी निगडित लक्षणांची वाट बघू नका. नियमितपणे प्रतिबंधात्मक तपासण्या या दीर्घकाळापर्यंत हृदयविकाराचे धोके कमी करण्याकरिता मदत करू शकतात, सोबतच एक चांगले जीवन जगण्यासदेखील मदत करू शकतात, असेही डॉ. जोशी यांनी सांगितले.
>मधुमेह असलेल्यांनी पौष्टिक खाण्याच्या सवयींचा अवलंब करावा आणि आपली औषधे नियमितपणे घ्यावीत. तंतुमय पदार्थांचा आहारात समावेश करावा आणि रिफाइंड धान्याचे प्रमाण कमी करावे. साखर घालून गोड केलेली पेय कमी करावीत. कॅलरीजवर आणि चरबीवरील नियंत्रणास १५० मिनिटे/आठवड्याला अ‍ॅरोबिक व्यायाम किंवा योगासने जसे प्राणायाम आणि रिलॅक्सेशन केल्यास रक्तातील साखरेचा स्तर नियंत्रित राहू शकतो. कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरू घ्यावा. अशा प्रकारच्या लहान, निरोगी जीवनशैली बदलांमुळे, मधुमेह असलेल्या व्यक्तींना हृदयरोगापासून दूर राहाणे सहज शक्य आहे. यामुळे निरोगी, तसेच दीर्घायुष्य मिळू शकते .
- डॉ. एलिन कॅन्डी, आहारतज्ज्ञ आणि मधुमेह समुपदेशक.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Controlling family diabetes by making lifestyle changes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.