'ती' इतक्या जोरात हसली की तोंडच बंद होईना, डॉक्टरही तिला पाहून झाले होते हैराण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 16:58 IST2019-09-12T16:54:10+5:302019-09-12T16:58:26+5:30
हसणं हे आरोग्यासाठी किती फायदेशीर असतं हे काही तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. मात्र, फार जास्त जोरात हसणंही अनेकदा नुकसानकारक ठरू शकतं.

'ती' इतक्या जोरात हसली की तोंडच बंद होईना, डॉक्टरही तिला पाहून झाले होते हैराण...
हसणं हे आरोग्यासाठी किती फायदेशीर असतं हे काही तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. मात्र, फार जास्त जोरात हसणंही अनेकदा नुकसानकारक ठरू शकतं. चीनमधील महिलेसोबत असंच काहीसं झालं. ही महिला रेल्वेने प्रवास करत होती. दरम्यान ती मोठ्याने हसली आणि तिचं तोंड उघडंच राहीलं. म्हणजे महिलेचं तोंड बंदच होत नव्हतं. अखेर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
सरकला जबडा
चीनची वेबसाइट ‘guancha.cn’ च्या रिपोर्टनुसार, एक महिला कुनमिंग साऊथ येथून गुआंगझू साऊथ रेल्वे स्टेशनपर्यंत प्रवास करत होती. यादरम्यान तिला कशामुळे तरी हसू आलं. ती इतकी जोरात हसली की, तिचा जबडाच जागेवरून सरकला. त्यामुळे तिचं तोंडच बंद होत नव्हतं.
महिलेचं नशीब चांगलं होतं की, रेल्वेत एक इमरजन्सी डॉक्टर उपस्थित होता. महिलेसोबत बसलेल्या एका दुसऱ्या महिलेने रेल्वे कर्मचाऱ्याला याची घटनेची माहिती दिली. नंतर डॉक्टर लुओ वेनशेंग महिलेच्या मदतीसाठी आले.
डॉ. लुओ यांनी महिलेची स्थिती पाहताच स्पष्टपणे सांगितलं की, मी अशाप्रकारच्या केसेसचा तज्ज्ञ नाही. तसेच महिलेला लगेच एखाद्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागेल असंही ते म्हणाले. मात्र, तिथे असलेल्या प्रवाशांनी डॉक्टरांनी प्रयत्न करण्याची विनंती केली. कारण पुढच्या स्टेशनला पोहोचायला वेळ लागणार होता. अनेक प्रयत्नांनंतर डॉक्टरांनी महिलेचा जबडा पुन्हा जागेवर आणला.
महिलेसोबत याआधीही झालं होतं
या महिलेसोबत प्रवास करणाऱ्या दुसऱ्या महिलेने सांगितले की, याआधीही एकदा असाच या महिलेचा जबडा सरकला होता. ती प्रेग्नेंट असताना उलटी आल्यावर तिच्यासोबत असं झालं होतं. डॉक्टरांनी तिला लगेच तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास सांगितले.