2050पर्यंत जवळपास 60 कोटी भारतीयांना होऊ शकतात 'हे' आजार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 15:24 IST2018-08-30T15:21:40+5:302018-08-30T15:24:13+5:30
भारतातील वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साइडची लेव्हल वाढल्यामुळे 2050 पर्यंत कोट्यवधी लोकांच्या शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता होण्याची शक्यता आहे.

2050पर्यंत जवळपास 60 कोटी भारतीयांना होऊ शकतात 'हे' आजार!
भारतातील वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साइडची लेव्हल वाढल्यामुळे 2050 पर्यंत कोट्यवधी लोकांच्या शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता होण्याची शक्यता आहे. कारण एका नवीन संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे की, वातावरणातील वाढत्या प्रदुषणामुळे आणि कार्बन डायऑक्साइडची लेव्हल वाढल्यामुळे तांदूळ आणि गव्हासारख्या प्रमुख पिकांमधील पौष्टीक तत्व कमी होत चालली आहेत.
अमेरिकेतील हार्वड टीएच चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या आभ्यासकांनी केलेल्या संशोधनातून असं सिद्ध झालं की, मानवनिर्मित वस्तूंमुळे कार्बन डायऑक्साइडच्या स्तरामध्ये वाढ होत असून जगभरामध्ये 17.5 कोटी लोकांमध्ये झिंकची कमतरता आढळून येत आहे. तर 12.2 कोटी लोकांमध्ये प्रोटीनची कमतरता आढळते.
'नेचर क्लाइमेट चेंज' जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनानुसार, एक अब्जपेक्षा अधिक महिला आणि मुलांच्या खाण्यामध्ये आयर्न तत्वांची उपलब्धता फार कमी होते. यामुळे त्यांच्यामध्ये एनीमिया आणि इतर आजार होण्याचा धोका संभवतो.
संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, वातावरणातील कार्बन डायऑक्साइडची लेव्हल वाढल्यामुळे भारताला इतर देशांच्या तुलनेत अधिक नुकसान भोगावे लागणार आहे. जवळपास 5 कोटी लोकांमध्ये झिंकचे प्रमाण कमी झालं असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संशोधकांनी सांगितल्यानुसार, भारतात 3.8 कोटी लोकांमध्ये प्रोटीनची कमतरता होऊ शकते आणि आयर्नच्या कमतरतेमुळे 50.2 कोटी महिला आणि मुलांमध्ये यांसंबंधातील आजार बळावण्याची शक्यता आहे.
त्यांनी सांगितले की, दक्षिण आशिया, दक्षिणपूर्व आशिया, आफ्रिका आणि पश्चिम आशिया यांसारख्या देशांवरही याचा विशेष प्रभाव पाहायला मिळतो.